पुणे, डॉ. संदेश शहा.
सोमवार, २९ जून २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९
पुणे कात्रज दत्तनगर येथील आनंद दरबार मध्ये ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त सामूहिकपणे आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांची भव्य आराधना करण्यात आली. यावेळी आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रतिमा व कमलाकृती १४ शुभ चिन्हासह चरण पादुकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. आनंद दरबार चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बाळासाहेब धोका म्हणाले, आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांचा श्रावण शुद्ध १ ( ८ जानेवारी १९०० ) रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी येथे जन्म झाला. त्यांना बालपणापासूनच कीर्तन भजन अध्यात्म ची आवड होती. त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून सन १९१३ मध्ये अल्पवयात जैन श्रमण दीक्षा घेतली. कठोर तप, स्वाध्याय व साधना, विलक्षण अभ्यास, प्रभावी प्रवचने, सोपी भाषा आणि संघटन कौशल्यामुळे त्यांना "आचार्य सम्राट" हा मानाचा बहुमान प्राप्त झाला. त्यांनी जैन आगमांचा प्रसार, अहिंसा, सत्य, संयम, व्यसनमुक्ती, नैतिक मूल्ये आणि मानवसेवा यांचा संदेश देशभर दिला. ते नेहमी आपल्या प्रवचनाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने करत असत. त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र असली तरी त्यांची कर्मभूमी संपूर्ण भारत देश होता. त्यामुळे त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. भारतात सर्वप्रथम त्यांची प्रतिमा तसेच १४ शुभ चिन्हासह कमलाकृती चरणपादुका स्थापना दत्तनगर कात्रज पुणे येथे करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. जिव्हाळ्याच्या सर्व शक्तींना एकत्र करून मी हे स्वप्न साकार केले. मात्र मी केवळ निमित्त आहे. त्यांच्या अनमोल कार्याची माहिती सर्वांना व्हावी म्हणून दर पौर्णिमेस आनंद उत्सव सुरू केला. त्याला सर्वधर्मीयांचा उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद लाभत आहे.
यावेळी प्रभावना व प्रसादी मनोज मुकेश छाजेड, सौ. उज्वला शरद लुणावत, विआन सूरज पारख यांनी केले. यावेळी शरद लुणावत, अशोक कटारिया, रमेशचंद संचेती, पन्नालाल भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद दरबार संचलित श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक आनंद रत्न जैन स्थानक दत्तनगर संघाने परिश्रम घेतले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा