*तुळजापूर प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*तुळजापूर, दि. 12 जून 2026:* महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. च्या तुळजापूर विभागीय कार्यालयात आज माहिती अधिकार अपिलाची सुनावणी ठेवली असताना प्रथम अपिलीय अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता हेच गैरहजर राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते व अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तांबोळी मकबुल आल्लाउद्दीन यांनी ऑक्टोबर 2025 पासून तुळजापूर तालुक्यातील वीज चोरी प्रकरणे, दाखल FIR, वसूल दंड व कारवाईची माहिती मागितली होती. 92 दिवस उलटूनही माहिती न मिळाल्याने त्यांनी प्रथम अपील दाखल केले होते.
आज दि. 12/06/2026 रोजी दुपारी 03:00 वाजता कार्यकारी अभियंता कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. अपीलकर्ता तांबोळी हे वेळेवर सर्व कागदपत्रांसह हजर झाले. मात्र, सुनावणी घेणारे अपिलीय उप अधिकारी हे स्वतःच गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.
*"हा माहिती अधिकार कायद्याचा उघड अवमान आहे. वीज चोरीचे कोट्यवधींचे आकडे बाहेर येतील म्हणून अधिकारी पळ काढत आहेत. माझ्या हजेरीचा पंचनामा व लेखी म्हणणे मी आवक कक्षात दाखल केले आहे. हा पुरावा राज्य माहिती आयोगाला देऊन संबंधित अधिकाऱ्यावर ₹25,000 दंडाची व शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी करणार आहे,"* असा आरोप तांबोळी मकबुल यांनी केला.
माहिती अधिकार कायदा 2005 च्या कलम 7(1) नुसार 30 दिवसात माहिती देणे बंधनकारक आहे. कलम 20(1) नुसार माहिती दडवल्यास व सुनावणी टाळल्यास ₹250 प्रती दिन दंड व शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.
तांबोळी यांनी दुसरा RTI अर्ज दि. 27/05/2026 रोजी वीज अपघातात मृत/जखमी व्यक्ती व जनावरे यांच्या नुकसान भरपाईबाबत दाखल केला आहे. "एक अर्ज जनतेच्या पैशाचा, दुसरा जनतेच्या जीवाचा. दोन्ही महावितरण दडवत आहे," असे ते म्हणाले.
या प्रकरणी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
*आता अपीलकर्ता तांबोळी राज्य माहिती आयुक्त, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांच्याकडे द्वितीय अपील व तक्रार दाखल करणार आहेत.*
-






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा