*यशवंतनगर-- प्रतिनिधी*
*नाझिया मुल्ला*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
कष्टांना जेव्हा गुणवत्तेची जोड मिळते, तेव्हा यशाचे सुवर्णशिखर गाठले जाते या प्रेरणादायी विचारांची प्रचिती देणारा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथे शुक्रवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
स्वागतगीताने संपूर्ण कार्यक्रमात प्रेरणा, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. बाळासाहेब महादेव सणस व मा. श्री. वसंत पांडुरंग जाधव संचालक शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी प्रास्ताविकातून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
यावेळी इयत्ता दहावी , बारावी व ओलिंपियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा विशेष गौरव करण्यात आला.
याच प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे सोलापूर यांचेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले सहशिक्षक गणेश जाधव व सहशिक्षिका रुक्साना नदाफ या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा गौरव केला.
ओलंपियाड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पालक प्रभाकर बिराजदार याचे वतीने मुख्याध्यापक संजय गळीतकर , सहशिक्षिका कल्पना जाधव व नाझिया मुल्ला याल शिक्षकांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न झाला .
गुणवंत विद्यार्थिनी समृद्धी बाबर हिने आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि विद्यालयाला दिले.
प्रमुख अतिथी वसंत जाधव संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची, सातत्याने प्रयत्न करण्याची आणि समाजासाठी आदर्श नागरिक बनण्याची प्रेरणा मिळाली.
सदर कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक असिफ झारेकरी, प्राध्यापक धनंजय देशमुख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावी व ओघवत्या शैलीत बालाजी तेलंग यांनी केले. उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक उमेश बोरावके यांनी मानल्यानंतर सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा