Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

*रस्त्याच्या कामाचे साहित्य आणि वाहनांमुळे शाळेच्या मैदानाचे नुकसान; अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची सुरक्षितता धोक्यात* *पावसात झालेले काम ताडपत्रीने झाकले; रस्त्याची गुणवत्ता रामभरोसे*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा, - शहरातील नगरपालिका हद्दीतील महात्मा फुले पुतळा ते जुने विश्रामगृह या रखडलेल्या रस्त्याचे काम सध्या विविध कारणांनी चर्चेत येत आहे. या कामामध्ये काँक्रीटच्या मिश्रणात मातीही मिसळलेली जात असल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत असतानाच या कामाच्या ठेकेदाराने कामाचे साहित्य शहरातील करमाळा नगरपालिकेच्या शाळांमध्ये एकमेव असलेल्या मोठ्या मैदानात टाकल्याने या मैदानाची दुरावस्था होत आहे.

प्रत्यक्षात हे काम कार्यारंभ आदेशानंतर बारा महिन्यांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र या कालावधीत काम पूर्ण होणे तर दूरच बारा महिन्यांपर्यंत या कामाची सुरुवात ही झालेली नव्हती. ऐन पावसाळ्याच्या आणि आषाढी एकादशीच्या आणि तोंडावर हे काम सुरू झाले. सुदैवाने पावसाने ओढ दिल्यामुळे या रस्त्याची डावी बाजू अर्ध्यापर्यंत पूर्ण झाली असली तरी अर्धवट झालेल्या कामांमुळे आषाढी वारी पूर्वी करमाळा दौरा केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या या रस्त्याचे काम सा.बां. उपविभाग करमाळाचे उप अभियंता यांच्या देखरेखीखाली होणे गरजेचे आहे. मात्र या कामासाठी पिचिंग सुरू असताना पाण्याचा वापर न करताच खडी दाबण्यात येऊन काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याच्या प्रयत्नात ठेकेदार दिसत आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे सदर ठेकेदाराने ताडपत्रीचे आच्छादन टाकून नुकतेच झालेले काम झाकण्याचा प्रयत्न केला असला तरी जोरदार पावसामुळे या प्रयत्नाचा कितपत परिणाम होईल, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे या रस्त्याबाबत नागरिकांतून उलट सुलट चर्चा होत असून हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

अशातच या कामासाठी वापरात येणारी खडी, क्रश सॅंड, सिमेंट आदी मटेरियल डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेच्या प्रांगणात उतरवण्यात येत आहे. चारही बाजूंनी बंदिस्त कंपाउंड असलेल्या या शाळेला एकमेव प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारातूनच शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासह रस्त्याच्या कामासाठी वापरात येणारे सिमेंटचे ट्रक, खडीचे टिपर, पाण्याचे टँकर आणि काँक्रीट मिक्सर यांच्या वर्दळी मुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय या वाहनांमुळे शाळेच्या प्रांगणाची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

शाळेच्या मैदानाच्या वापराबाबत ठेकेदाराने शाळेकडून किंवा करमाळा नगरपालिकेकडून कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले आहे. याबाबत मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्याशी संपर्क साधला असता सदर ठेकेदारास याबाबत पत्र काढण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

फोटो 

रस्त्याच्या कामाच्या मटेरियल च वाहतुकीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेच्या खेळाच्या मैदानाची झालेली दुरावस्थासोमवारी दुपारी झालेल्या पावसामुळे रस्त्यचे नुकतेच झालेले काँग्रेसचे काम ताडपत्रीने झाकण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा