*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
नुकताच मी करमाळ्यात चांदगुडे सिनेमागृहात मदार हा चित्रपट पाहिला. हा मदार चित्रपट करमाळ्याच्या भूमीतील सुपुत्र सिनेदिग्दर्शिक मंगेश महादेव बदर यांनी केला आहे. मंगेश बदर हे एक संवेदनशील मनाचे कथाकार आहेत. मदार हा शब्द ग्रामीण बोली भाषेत सदैव ऐकायला मिळतो. मदार म्हणजे भरोसा किंवा विश्वास. या चित्रपटात करमाळा परिसर तसेच ग्रामीण भाग येथील लोकांची धडपड मांडली आहे. मंगेश बदर हे ग्रामीण भागातील म्हणजे घोटी ता करमाळा येथील रहिवासी.. या घोटीची परिस्थिती दुष्काळात अथवा उन्हाळ्यात पाण्यासाठी भयंकर असते. या गावात जिल्हयात सर्वांत जास्त खोल असलेले बोअरवेल आहेत तसेच बोअरवेलची संख्या ही अधिक आहे.असे मागे काही वर्षापूर्वी दै अँग्रोवन या कृषी वृत्तपत्राने,तसेच सा संदेशने प्रसिध्द केलेले होते. या गावाने ,येथील लोकांनी पाण्यासाठी खूप सोसले असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच या वास्तव चित्रपटाची निर्मिती झाली आहे. हे गाव प्रतिनिधीक स्वरूपात आहे. राज्यात किंवा देशातही अनेक गावात पाणीप्रश्न खूप मोठा आहे. चित्रपटात दुष्काळात गावातील लोकांचे पुरेशा पाण्याअभावी खूप हाल झालेले दिसून येतात. बोअरवेल बंद पडत आहेत. लाईट चालत नाही. अशा अनेक समस्या आहेत. गावातले लोक त्यांचे स्वभाव, एकमेकांना मदत करणारी माणसं, पडझड होत चाललेले मोठमोठे वाडे , पुणे, मुंबईकडे कामधंदा करण्यासाठी गेलेली तरुण पिढी. पाण्यासाठी हाल सोसणारे ग्रामस्थ, शेवटच्या घटका मोजत असलेली तरीही रोजच्या प्रसंगाला सामोरे जाणारी म्हातारी माणसं, शाळकरी मुलं, देवळात भजन करणारी मंडळी, आदी अचूकपणे मंगेश बदर यांनी टिपले आहे. ते स्वतः हे सारे अचूक का टिपतात 'जिस तन को लागे वही तन जाने ' किंवा "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" या उक्तीनुसार मंगेश बदर यांनी हे सर्व ग्रामीण जीवनाची सुखदुःखे अनुभवली आहेत. पाहिली आहेत. म्हणून इतक्या सुंदर कलाकृतीची निर्मिती त्यांना करता आली आहे.
खरं तर " पाणी म्हणजे जीवन " या सुंदर आणि बोधप्रद वाक्याचा अर्थ हा चित्रपट पाहिल्या शिवाय कळणार नाही.
चित्रपटातील कलाकारांची संवाद भाषाशैली :
नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाच्या कथेचा शेवट शोकात्म होतो. ते समाजातील वास्तव आहे. तरी ते मनाला टोचत राहते. कथेचा शेवट सुखात्म झाला तर प्रेक्षकांना आनंद मिळतो.
असाच मदार कथेच्या शेवट आनंददायी आहे. पाऊस प्रेक्षकांना शेवटी आनंद देतों. प्रेक्षक सिनेमागृहातून आपल्या मनात पडलेला आनंदाचा पाउस घेऊन बाहेर पडतो.
करमाळा परिसर चित्रपट नगरी होत आहे. फॅन्ड्री, सैराट, च्या माध्यमातून सुप्रसिद्ध कवी, दिग्दर्शक नागराज आण्णा मंजुळे यांनी मराठी चित्रसृष्टीवर आपला ठसा उमटला आहे. तशाच प्रकारे मदार आणि त्यांची टीम तशाच प्रकारे पुढे जात आहे.
चित्रपट का बघावा.-
घोटीचे सुपुत्र श्री. मंगेशजी बदर निर्मित ‘मदार’मध्ये दुष्काळ, पाणीटंचाई आणि ग्रामीण जीवनातील संघर्षाचे संवेदनशील व वास्तववादी चित्रण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा २१व्या संत तुकाराम सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पाच पुरस्कार आणि कान्सच्या Film Market मधील निवडीने गौरविलेला गेला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांना या क्षेत्रातील महत्वाचे पुरस्कार ही मिळालेले आहेत.
चित्रपटाचा गल्ला किंवा भरपूर प्रेक्षक हेच केवळ यश नव्हे.
आजकाल अभ्यासक किंवा विचारवंत प्रसिद्ध नाहीत. पण रिलवाले खूप प्रसिद्ध आहेत. इंस्टाग्राम सारख्या मिडीया वापरणारे वगैरे...खूप प्रसिद्ध आहेत म्हणून ने समाजात मागदिशक तत्वे पेरतील असे मुळीच नसते. त्यांच्यांकडून त्या अपेक्षाही करायच्या नसतात. असेच काही चित्रपट किंवा नाटकांचे बाबतीत ही असते. त्या सिनेमा किंवा नाटक यांच्या कथेचा गाभा, आशय महत्वाचा आहे.
आजकल चित्रपट चालण्यासाठी हिंदी किंवा अन्य भाषेत असलेल्या चित्रपटात विविध फंडे वापरले जात आहेत...
चित्रपट विशिष्ट जात,धर्म यांचा आधार घेऊन, मांडणी. करणे, तसेच कुख्यात व्यक्ती किंवा घटनेवर सिनेमा तयार करणे.. चित्रपटात साऊथच्या सिनेमा सारखा हिंसाचार वगैरे दाखवणे, नायिकेचे खूप टोकाला जाऊन अंगप्रदर्शन करणे अशा अनेक युक्त्या वापरल्या जातात.पण मदारचा हेतू प्रामाणिक आहे. अगदी चित्रपटातील मोहिते सर या पात्रासारखा.
प्रसिद्ध अभिनेते मिलींद शिंदे यांनी केलेला अभिनय नेहमीप्रमाणे खूपच दमदार आहे. प्रेक्षकांच्या अंतःकरणाला भिडणारे संवाद आणि अभिनय आहे. चित्रपटातील मोहिते सर यांचा ."एक न एक दिवस पाऊस येईल" यावर अढळ विश्वास आहे. ते प्रामाणिकपणे सर्व काही करत आहेत. गावातल्या गोरगरीब, दुःखाने पिचलेल्या लोकांशी जिव्हाळा ठेवून त्यांना मदत करत आहेत. वाड्याच्या छतावर जाऊन चिमण्यांना पाणी आणि तांदुळ ठेवत आहेत. कावडीने घरोघरी पानी भरणार्या गरीब डिगाला मदत करत आहेत. बुडती हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणोनिया॥ अशी संत तुकाराम महाराज यांच्या अभंग वाणीची आठवण यावी अशी मोहिते सर यांची अवस्था झाली आहे. घरची परिस्थिती चांगली असुनही, मुलगा शहरात त्यांना बोलावत असुनही ते आपले गाव आणि माणसं सोडायला तयार नाहीत. दाहक दुष्काळाने त्यांच्या चेहर्यावरचे हसू पूर्ण मावळले आहे.ते गंभीर आणि अवस्थ आहेत. व्यथीत आहेत. पण आपलं दुःख ते सहजासहजी कुणाला सांगत नाहीत. त्यांची धीर गंभीर मुद्रा न बोलताही खूपकाही सांगून जाते. त्यांची पत्नी ही तितकीच सोशीक आहे.
बिंड्या आणि आशीची प्रेमकहाणी: तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या बिंड्या आणि आशी यांच्या प्रेमाची किनार ही या कथेला आहे. बिंड्या ( आजिनाथ जाधव ) कामधंदयासाठी इतर मित्रांसारखा शहरात जात नाही. तो त्याची प्रियेसी आशीसाठी (अमृता अग्रवाल ) गाव सोडायला तयार नाही. तर त्याने शहरात जावे व पैसे कमवावे असे सांगून सांगून हतबल झालेला त्याचा बाप ही दुःखी आणि अस्वस्थ आहे. आईबाप त्याला शहरात जा म्हणत आहेत. तर प्रियेसीला त्याच्या विरहाची कल्पनाही सहन होत नाही. अशा कात्रीत सापडलेला हा बिंड्या काय करावे ते सुचत नाही. त्याची प्रियेसी आशी हिला तो अनेकवेळा समजुन सांगण्याचा प्रयत्न करतो की मी पाऊस पडल्यापर परत येईल. पण तिला ते मान्य नाही. यावरून त्यांच्यात अनेकवेळा भांडनेही होतात. पण दोघांनाही एकमेकांशिवाय सुखदुःख सांगायला पर्यायच नाही. अशा या सुखदुःखाच्या प्रसंगात ते एकमेकांना ग्रामीण बोलीत शिव्याही हासडतात. सुसाट सायकल चालवणारी सिनेमाची नायिका आशी सैराटमधल्या बुलेट चालवणार्या आर्ची सारखीच भाव खाऊन जाते. पण सिनेमात प्रेमकहानी येऊनही मूळ कथेचा आशय आपली जागा सोडत नाही. मोहिते सर, किंवा बिंड्याला पडलेली स्वप्नं काही क्षण चित्रपटाचा सस्पेन्स वाढवतात......
हरिभाऊ हिरडे, करमाळा. संपर्क 8888148083




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा