पुणे, श्रमण संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी मंगळवारी ‘जेन-झी’शी संवाद साधला. खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘भविष्यवेध : युवा विद्यार्थ्यांशी संवाद’ या विशेष उपक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले.
बदलत्या काळातील संधी, आव्हाने आणि यशाचा मार्ग याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना त्यांनी ‘चार एफ’चा प्रभावी मंत्र युवापिढीस दिला. ‘फाइन्ड म्हणजे शोधा, फिक्स म्हणजे निश्चित करा, फाइट म्हणजे झुंजा आणि फिनिश म्हणजे पूर्ण करा’ या चार सूत्रांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले. ‘सर्वप्रथम स्वतःच्या आवडी, क्षमता आणि ध्येयाचा शोध घ्या. त्यानंतर ध्येय निश्चित करून त्यासाठी योग्य नियोजन करा. नियोजनाची अंमलबजावणी करताना कितीही अडचणी आल्या, तरी झुंज देत राहा आणि हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्या,’ असा संदेश त्यांनी दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे प्रास्ताविक भाषणात म्हणाले, ‘आजची ‘जेन-झी’ पिढी तंत्रज्ञानाच्या सहवासात वाढलेली, कल्पक आणि माहितीसमृद्ध आहे.’ माहितीच्या प्रचंड उपलब्धतेचे रूपांतर ज्ञानात, ज्ञानाचे कौशल्यात आणि कौशल्याचे यशात करणे हे तिच्यासमोरील मोठे आव्हान आहे. करिअरची दिशा, ध्येय निश्चिती, वेळेचे नियोजन, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाचा विधायक वापर या बाबतीत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘भविष्यवेध’चे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्री.
काळकर यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना विद्यार्थ्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. खडकी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमकुमार इंदोरे यांच्या हस्ते श्री. काळकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य जुगल नाईक, डॉ. सुचेता दळवी, उपप्राचार्य राजेंद्र लेले यांच्यासह प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वामीराज भिसे यांनी तर आभार प्रा. लेले यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा