*उमरगा प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
उमरगा : शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले, डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव यासह विविध नागरी प्रश्नांवर जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती करण्याच्या उद्देशाने ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने दि. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ उमरगा, सुंदर उमरगा, हरीत उमरगा” महाअभियानाची स्वातंत्र्यदिनी सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी सकाळी श्रमदान व गांधीगिरी, तर सायंकाळी काळे प्लॉट परिसरात पाहणी, पत्रक वाटप आणि नागरिकांशी संवाद अशी दोन सत्रे घेण्यात आली.
फाउंडेशनच्या कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय जाधव, धम्मचारी प्रज्ञाजीत व ॲड. शीतल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थी, युवक, महिला व फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्वच्छतेचे संदेश देणारे फलक हाती घेऊन घोषणाबाजी करत बालाजी मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर, हमीद नगर व डॉ. गणेश नगर येथे श्रमदान केले. विविध ठिकाणी उघड्यावर पडलेला जवळपास 10 पोते कचरा संकलित करण्यात आला.
यावेळी नागरिकांशी संवाद साधला असता कचरा गाडी नियमित येत नसल्याने उघड्यावर कचरा टाकण्याची वेळ येते, नाल्यांची नियमित व व्यवस्थित साफसफाई होत नाही, तुंबलेल्या नाल्यांतील पाणी घरांच्या भिंतीलगत साचल्याने भिंती ओल्या व कुजकट होत आहेत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. नाल्यांतून काढलेली घाण वेळेवर उचलली जात नसल्याने डुकरे, कुत्री व पावसाच्या पाण्यामुळे ती पुन्हा नाल्यांत जाऊन नाले तुंबत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
पहिल्या सत्राच्या अखेरीस श्रमदानातून संकलित केलेली 10 पोती कचरा नगर परिषदेसमोर ठेवून त्याला हार घालत प्रतीकात्मक ‘गांधीगिरी’ करण्यात आली.
सायंकाळच्या दुसऱ्या सत्रात फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी काळे प्लॉट परिसरात पाहणी दौरा करून घरोघरी पत्रके वाटली आणि नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. या भागातही कचरा गाडी नियमित येत नसणे, नाल्यांची साफसफाई न होणे तसेच डुकरे व मोकाट कुत्र्यांचा मोठा उपद्रव असल्याच्या तक्रारी समोर आल्या.
विशेष म्हणजे, नगराध्यक्षांनी उमरगा शहर दहा दिवसांत वराहमुक्त करण्याचे आश्वासन दिल्याची बातमी दि. 9 जुलै 2026 रोजी दैनिक ‘लोकमत’च्या ‘हॅलो धाराशिव’ पुरवणीत प्रसिद्ध झाली होती. मात्र त्यानंतर एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही अनेक भागांत डुकरांचा उपद्रव कायम असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. निवडणुकीत तसेच निवडून आल्यानंतर दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण होत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मौलाना आझाद चौक ते काळे प्लॉट रस्त्याची गंभीर अवस्थदुसऱ्या सत्रात काळे प्लॉट परिसरातील जवळपास 50 महिलांनी स्वतः पुढाकार घेत फाउंडेशनच्या प्रतिनिधींसोबत मौलाना आझाद चौक ते काळे प्लॉट हा संपूर्ण रस्ता पायी चालत समस्या प्रत्यक्ष दाखवल्या.
या रस्त्याची तसेच लगतच्या नाल्याची अवस्था अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आले. नागरिकांना रात्रीच्या अंधारात दगड-धोंड्यांमधून ठेचाळत चालावे लागत असून पादचारी व दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. याच मार्गावरून विद्यार्थी मुला-मुलींनाही दररोज ये-जा करावी लागते.
रस्त्यालगतचा नाला मोठ्या प्रमाणावर तुंबलेला असून त्यामध्ये घाण व सांडपाणी साचले आहे. नाल्यातील दूषित पाणी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या व्हॉल्व्हपर्यंत येत असल्याचेही पाहणीदरम्यान दिसून आले. मोठा पाऊस झाल्यास तुंबलेल्या नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि लगतच्या घरांमध्ये शिरत असल्याचे महिलांनी सांगितले. नाल्याची खोली व सद्यस्थिती पाहता एखादी व्यक्ती अथवा लहान मूल चुकून त्यात पडल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, पाहणी दौऱ्यावेळी प्रभाग क्र. 5 च्या नगरसेविका दुर्गाताई धोत्रे यांनी फाउंडेशनच्या प्रतिनिधींना घरी बोलावून संवाद साधला तसेच फाउंडेशनच्या वाचनालयासाठी काही पुस्तके भेट दिली.
समस्या लेखी स्वरूपात नगर परिषदेला; कार्यवाही न झाल्यास मोर्चामहाअभियानाच्या दि. 15 व 16 ऑगस्ट रोजी पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व समस्यांची ठिकाणनिहाय माहिती सोमवार, दि. 17 ऑगस्ट रोजी नगर परिषदेला लेखी स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्यास अभियानाचाच भाग म्हणून नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. अभियानात निदर्शनास येणाऱ्या समस्यांचे संपूर्ण निराकरण होईपर्यंत लेखी पाठपुरावा, जनजागृती, गांधीगिरी व अन्य शांततामय लोकशाही मार्गांचा अवलंब करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
पहिल्या सत्रात शांताबाई चव्हाण, ॲड. शीतल चव्हाण, धम्मचारी प्रज्ञाजीत, विजय जाधव, प्रा. राजू बटगिरे, ॲड. अर्चना जाधव, ॲड. फिरोज मुल्ला, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, इरान्ना बसगुंडे, राम लोहार, प्रदीप चौधरी, करिम शेख, किशोर बसगुंडे, ज्योती माने, मयूर कटके, विजय चितली, सिद्राम जमादार, नागेश चलकुरे यांच्यासह बहुजन हिताय वसतिगृहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सायंकाळच्या पाहणी दौऱ्यात ॲड. शीतल चव्हाण, प्रा. राजू बटगिरे, राजू भालेराव, ॲड. अर्चना जाधव, प्रदीप चौधरी, मयूर कटके, किशोर बसगुंडे, नागेश चलकुरे, रागिनी शानेदिवाण यांच्यासह काळे प्लॉट परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी; मात्र नियमित कचरा संकलन, नाल्यांची स्वच्छता, सुरक्षित रस्ते आणि डुकरे व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त ही नगर परिषदेची मूलभूत जबाबदारी असून, ती पार पाडण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा