Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६

*दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; शिक्षक सेनेच्या निवेदनाला यश*

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
* सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; पुढील आदेशापर्यंत परीक्षा शुल्क न घेता अर्ज भरून घेण्याचे बोर्डाचे निर्देश सोलापूर : दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्कमाफी देऊन निशुल्क परीक्षा अर्ज भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्ह्याने केलेल्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या पत्राद्वारे दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता परीक्षा आवेदनपत्रे भरून घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचाही समावेश आहे. याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्य मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी एसएससी बोर्ड, पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्षांकडे निवेदन देऊन सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त सर्व ११ तालुक्यांमधील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निशुल्क परीक्षा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथील सचिव डॉ. दीपक माळी यांच्या स्वाक्षरीने २९ सप्टेंबर २०२६ रोजी तातडीचे व महत्त्वाचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे. या पत्रात फेब्रुवारी–मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत तात्काळ सूचना देण्याचे आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास सादर करण्याचे निर्देशही विभागीय मंडळांना देण्यात आले आहेत. मंडळाच्या पत्रात शासन निर्णय दिनांक २५ सप्टेंबर २०२६ सोबतच राज्य मंडळाने यापूर्वी १३ ऑगस्ट व १८ ऑगस्ट २०२६ रोजी निर्गमित केलेल्या पत्रांचा तसेच २८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शुल्कमाफी प्रतिपूर्तीबाबतच्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. शिक्षक सेनेच्या निवेदनामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक भार कमी होणार आहे. या निर्णयाबद्दल सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थी, पालक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने एसएससी बोर्ड, पुणे विभागीय मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले. *“दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळावा, ही शिक्षक सेनेची भूमिका होती. त्यासाठी केलेल्या निवेदनाची दखल घेऊन राज्य मंडळाने तातडीने कार्यवाही केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल राज्य मंडळाचे मनःपूर्वक आभार,”* अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा