Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

आदिनाथ सहकारी साखर कारखाना आता ओंकार ग्रुपच्या ताब्यात ; कोर्टाने केला शिक्कामोर्तब.

*निमगाव मगराचे -प्रतिनिधी* *रामचंद्र मगर* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा (जि. सोलापूर): राज्यातील सहकारी साखर उद्योगाला नवसंजीवनी देण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ओंकार ग्रुपने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) मार्फत राबविण्यात आलेल्या विक्री निविदा, खरेदी प्रक्रियेत यश मिळवत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि., आदिनाथनगर, शेळगाव भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर हा कारखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि यावर कोर्टानेही शिक्कामोर्तब केला आहे. कायदेशीर बाबी, न्यायालयीन प्रक्रिया तसेच संबंधित प्राधिकरणांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पारदर्शक विक्री निविदा प्रक्रियेद्वारे ओंकार साखर कारखाना प्रा. लि. यांनी आदिनाथ कारखाना यशस्वीरित्या खरेदी केलेला आहे. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या आदिनाथ साखर कारखान्याला नवसंजीवनी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी सुरुवातीपासूनच शेतकरी, कामगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना केंद्रस्थानी ठेवून उद्योग उभारणीचे धोरण स्वीकारले आहे. यापूर्वीही ओंकार ग्रुपने विविध अडचणीत आलेले साखर कारखाने यशस्वीरित्या सुरू करून शेतकऱ्यांच्या ऊसाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आदिनाथ कारखान्याच्या पुनरुज्जीवनाबाबत परिसरातील शेतकरी, कामगार व व्यापारी वर्गामध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओंकार ग्रुपने हा कारखाना खरेदी केल्यामुळे करमाळा तालुक्यासह परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऊसाचे वाहतूक अंतर कमी होणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक स्तरावर सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा थेट परिणाम ऊसतोड मजूर, वाहतूकदार, स्थानिक व्यापारी, लघुउद्योजक आणि ग्रामीण रोजगारावर होणार आहे. *ओंकार ग्रुपच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, कारखान्याचे आधुनिकीकरण, उत्पादन क्षमता वाढ, कार्यक्षम व्यवस्थापन आणि सहउद्योगांच्या माध्यमातून कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना योग्य ऊसदर, पारदर्शक व्यवहार आणि वेळेत देयके देण्याचे धोरण ठेवण्यात येणार आहे.* परिसरातील शेतकरी प्रतिनिधींनीही या घडामोडीचे स्वागत केले असून, बंद किंवा अडचणीत आलेल्या उद्योगांना नवजीवन देण्याची ओंकार ग्रुपची भूमिका ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असल्याचे मत व्यक्त केले आहे. *आदिनाथ साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन हे केवळ एका उद्योगाचे हस्तांतरण नसून, संपूर्ण परिसरातील शेती, रोजगार आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देणारे पाऊल असल्याची भावना शेतकरी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.* ओंकार ग्रुपने सदर कारखान्याला परिसराच्या विकासाचे केंद्र बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा