Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

इंदापूरचे सुपुत्र, राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांना इंदापूरकरां कडून भावपूर्ण श्रद्धांजली, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केल्या सहवेदना.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूरचे भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, काँग्रेसचे स्पष्टवक्ता प्रवक्ते आणि संघर्षशील लेखक डॉ. रत्नाकर महाजन यांचे दि. ११ सप्टेंबर रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र इंदापूर तालुका व शहरातील अनेकांना त्या ठिकाणी पोहोचणे शक्य न झाल्याने, इंदापूर तालुका व शहर जनतेच्या वतीने बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सिद्धेश्वर मंदिर, इंदापूर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी इंदापूर शहर व तालुक्यातील विविध पक्ष, संघटना, वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. महाजन यांच्या प्रतिमेस त्यांची कन्या प्रियांका विश्वेश्वर कोन्नूर-महाजन, जावई विश्वेश्वर कोन्नूर आणि नात रेवा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात त्यांच्या आठवणींनी अश्रू तरळले. डॉ. महाजन यांचे शालेय शिक्षण इंदापूरच्या भूमीत झाले. इंदापूर ते दिल्ली, महाराष्ट्रापासून देशभरात त्यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक कार्याच्या आठवणींना यावेळी अनेकांनी उजाळा दिला.
या श्रद्धांजली सभेत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई गारटकर यांनी पाठविलेला शोकसंदेश राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे यांनी वाचून दाखविला. नगराध्यक्ष भरत शहा, भूविकास बँकेचे माजी संचालक राजेंद्र तांबिले, निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड कृष्णाजी यादव, राष्ट्रवादी कांग्रेसचे ( शरद पवार ) तालुका कार्याध्यक्ष महारूद्र पाटील, ॲड विजय आजोतीकर, माजी प्राचार्य अरविंद गारटकर, माजी सभापती दत्तात्रय शेंडे, शहर नागरिक संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे, भाजप शहराध्यक्ष किरण गानबोटे, निरा-भिमा कारखान्याचे संचालक उमेश पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, पत्रकार प्रा. नागनाथ शिंगाडे, माजी गटनेते कैलास कदम, आरपीआय ( आठवले गट ) जिल्हाध्यक्ष संदीपान कडवळे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक भास्कर गुरगुडे, राष्ट्रसेवा दलाचे गफूरभाई सय्यद, भटक्या-विमुक्त संघटनेचे तानाजी धोत्रे, तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास शेळके, रामराव पाडुळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी पुष्पराज जमदाडे, तय्यबभाई शेख, आदींनी आपल्या सहवेदना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. या सभेचे आयोजन हमीद आत्तार, महादेव चव्हाण, हनुमंत बोंगाणे, विनायक लोंढे, बाळासाहेब क्षीरसागर, गजानन पवार, दादा जाधव यांनी केले. शेवटी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. राजेंद्र तांबिले म्हणाले, डॉ. रत्नाकर महाजन यांचे शालेय शिक्षण इंदापुरातच झाले. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत अनेक आंदोलने केली. आणीबाणीच्या काळात २ ऑक्टोबर १९७५ रोजी गांधी जयंती दिनी दिल्लीतील राजघाटावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी महात्मा गांधींच्या समाधीला पुष्पचक्र वाहण्यासाठी आल्या असता, झाडीत लपलेले डॉ. महाजन 'आणीबाणी मुर्दाबाद' च्या घोषणा देत पुढे आले आणि त्यांनी महात्मा गांधींच्या समाधीवर डोके आपटून निषेध नोंदवला होता, ही घटना त्यावेळी देशभर गाजली होती. महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. ते राजकीय अभ्यासाचे 'रेडी रेकनर' मानले जात. शरद पवार, संभाजीराव काकडे, नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, भाई वैद्य, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. धर्मनिरपेक्ष विचाराला बळ मिळावे म्हणून जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षात त्यांनी विविध पदांवर काम केले. कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेल्या राज्य नियोजन मंडळाच्या कार्याध्यक्षपदी ते १० वर्षे होते. त्यांनी प्रसिद्ध केलेला 'मानव विकास अहवाल' देशभरात गाजला आणि सर्वत्र स्वीकारला गेला. राज्यासह इंदापूर तालुक्याच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची वैचारिक पोकळी राजकीय धुरिणांना कायम जाणवत राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा