इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २६
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी विकास निगम ( एनसीडीसी ) च्या महापरिषदेची ९३ वी बैठक एनसीडीसी मुख्यालयामध्ये एनसीडीसीचे अध्यक्ष, केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी २५ वर्षांचा रोड मॅप येत्या २ महिन्यांमध्ये तयार करण्याचे आदेश अध्यक्ष अमित शाह यांनी दिले.
या बैठकीत एनसीडीसीचे संचालक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी देशाच्या विकासामध्ये एनसीडीसी महत्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार अमित शाह यांनी काढले. संभाव्य रोड मॅप मध्ये संस्थात्मक रचना, संसाधन, कामकाजात बदल आदी मुद्द्यांचा समावेश असावा आदी महत्त्वपूर्ण सूचना अमित शाह यांनी केल्या.
देशाच्या ईशान्य भारतातील राज्यामध्ये सन २०१३ पासून पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विशेष सहकारी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील उत्पन्न सुमारे ३३००० कोटी रुपयांनी वाढू शकले तसेच जवळपास ८ लाख नवीन रोजगार निर्माण झाले असल्याचे बैठकीमध्ये अमित शाह यांनी आवर्जून सांगितले.
या महापरिषदेच्या बैठकीत देशातील सहकार संस्थांना चालू वर्षी रु. १ लाख ५० हजार कोटी कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट ठरवण्यात येऊन आगामी ५ वर्षांमध्ये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट ४ लाख कोटी पर्यंत नेण्याचे नियोजन करावे, असे ठरल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
•चौकट १) :-
देशातील साखर उद्योगाला ४० हजार कोटींचा कर्ज पुरवठा- हर्षवर्धन पाटील
--------------------------------
देशातील साखर उद्योगाला एनसीडीसी करून चाळीस हजार कोटींचा कर्ज पुरवठा करण्यात आला असून, त्यामध्ये महाराष्ट्राला ४००० कोटींचा कर्ज निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबद्दल या बैठकीमध्ये एनसीडीसीचे अध्यक्ष अमित शाह यांचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
•चौकट २) :-
एनसीडीसीचे देशभर मजबूत जाळे!
-------------------------------
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनसीडीसीचे मजबूत जाळे निर्माण झाले आहे. त्याचा फायदा साखर उद्योगासह इतर सहकारी प्रक्रिया उद्योग, शेतकरी, दुग्ध व्यवसाय, भारत टॅक्सी, मत्स्यव्यवसायक व महिलांना होत असल्याचे एनसीडीसीचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह यांनी महापरिषदेच्या बैठकीमध्ये नमूद केले.
फोटो:-नवी दिल्ली : एनसीडीसीचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापरिषदेच्या बैठकीमध्ये एनसीडीसीचे संचालक हर्षवर्धन पाटील व मान्यवर.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा