Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

नळदुर्गच्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मागणीची तात्काळ दखल मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून महसूल मंत्र्यांकडे प्रस्ताव; नागरिकांच्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय (Sub-Registrar Office) सुरू करण्याची मागणी शिवसेना तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी निवेदनाद्वारे केली होती.निवेदन देताना त्यांच्या सोबत मा.जिल्हाप्रमुख मोहन पनुरे होते. या मागणीची तात्काळ दखल घेत मंत्री परिवहन तथा पालकमंत्री धाराशिव प्रताप सरनाईक यांनी संबंधित मागणी पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाकडे पाठविली आहे. त्यामुळे नळदुर्ग येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होण्याच्या मागणीला आता प्रशासकीय पातळीवर गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नळदुर्ग हे ऐतिहासिक तसेच प्रमुख व्यापारी केंद्र असून परिसरातील अनेक गावांसाठी ते महत्त्वाचे ठिकाण आहे. नळदुर्ग येथील नागरिकांना जमीन खरेदी-विक्री, गहाणखत, वाटणीपत्र, हक्कसोडपत्र आदी दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी तुळजापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अमोल जाधव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नळदुर्गपासून तुळजापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे अंतर सुमारे ३० ते ४० आहे. या अंतरामुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दस्तऐवज नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
निवेदनात नळदुर्ग, अणदूर, जळकोट, इटकळ परिसरातील नागरिकांना तुळजापूर येथे ये-जा करण्यासाठी मोठा वेळ आणि आर्थिक खर्च करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तुळजापूर कार्यालयातील वाढलेल्या कामाच्या ताणामुळे दस्तऐवज नोंदणी प्रक्रियेसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. नळदुर्ग येथे स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय सुरू झाल्यास या परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दस्तऐवज नोंदणीची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात ३० सप्टेंबर २०२६ रोजी मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे तात्काळ दखल घेतली आहे. नळदुर्ग येथे स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याच्या मागणीबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी त्यांनी हे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठविले आहे. त्यामुळे नळदुर्ग येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याच्या मागणीला आता वरिष्ठ पातळीवरून पाठबळ मिळाले असून, महसूल विभागाकडून पुढील निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नळदुर्गसह अणदूर, जळकोट, इटकळ आणि परिसरातील नागरिकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू झाल्यास दस्तऐवज नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी अपेक्षा अमोल जाधव यांनी व्यक्त केली आहे. “नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून मांडलेल्या मागणीची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ दखल घेतल्याने या प्रश्नाला आता प्रशासकीय गती मिळाली आहे. महसूल विभागानेही तातडीने निर्णय घेऊन नळदुर्ग येथे स्वतंत्र दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करावे,” अशी मागणी परिसरातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा