*अकलूज-- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*मो:-9730867448*
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय कौशल्य,व्यावसायिक दृष्टिकोन, आर्थिक व्यवहार ज्ञान आणि व्यवस्थापन क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मार्केट मेनिया २०२६’ या उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या उपक्रमाचे उद्घाटन अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर होते.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे विक्रम साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करून चालत नाही तर प्रत्यक्ष व्यवहारातील अनुभव,आर्थिक नियोजन,ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आणि निर्णयक्षमता या बाबीही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाच्या असतात.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रातील संधी ओळखून आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले. ‘मार्केट मेनिया’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे प्रत्यक्ष धडे मिळणार आहे.व्यवसायाची संकल्पना मांडण्यापासून ते वस्तूंची निवड, विक्री,ग्राहकांशी व्यवहार,आर्थिक नियोजन आणि नफा-तोट्याचे व्यवस्थापन यांचा अनुभव विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळणार आहे.भविष्यात याच अनुभवाच्या बळावर विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विनायक सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी ‘मार्केट मेनिया २०२६’ या उपक्रमामागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला.सूत्रसंचालन प्रा. जनार्दन परकाळे यांनी केले.या उपक्रमाचे संकल्पक व समन्वयक म्हणून डॉ.विश्वनाथ आवड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसेच वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ.रत्नदीप गायकवाड, डॉ.गणेश धायगुडे आणि प्रा.विनायक माने,प्रबंधक राजेंद्र बामणे यांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
‘मार्केट मेनिया २०२६’ या उपक्रमांतर्गत एकूण ३२ आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.यामध्ये इडली,भेळ, दाल राईस,ज्यूस सेंटर,बिर्याणी, आईस्क्रीम यांसारख्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सबरोबरच महिलांच्या चप्पल,बॅग आणि कॉस्मेटिक्सचे स्टॉल्सही मांडण्यात आले आहेत.खाद्य पदार्थांच्या विविध चवींसह आकर्षक वस्तूंची खरेदी करण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध व्यवसायांची मांडणी केल्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि व्यावसायिक वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजारपेठेचा अनुभव घेता येणार असून ग्राहकांची आवड,मागणी-पुरवठा, विक्री तंत्र,जाहिरात,स्पर्धा आणि आर्थिक व्यवहार यांचे व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे ‘मार्केट मेनिया’ हा केवळ खरेदी-विक्रीचा उपक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय जडणघडणीचा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम ठरत आहे.या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनियर विभागातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला,सर्जनशीलतेला आणि उद्योजकीय क्षमतेला चालना देणारा ‘मार्केट मेनिया २०२६’ हा उपक्रम महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा