Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२६

उजनीच्या जीवघेण्या प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या नेत्यांचा दशक्रिया विधी करणार! शेतकरी, मच्छीमारांचा आक्रमक पवित्रा; १९ नोव्हेंबर रोजी चिखलठाण येथे अनोखे निषेध आंदोलन

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


उजनी जलाशय परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर, सौर ऊर्जा, ग्रीन एनर्जी यांसह पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या विरोधात आता उजनीकाठच्या शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. या प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या नेतृत्वाचा जाहीर निषेध करण्यासाठी त्यांचा दशक्रिया विधी करून आंदोलन करण्याचा आक्रमक निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची भेट घेऊन आंदोलकांच्या वतीने अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. उजनी जलाशयावर प्रस्तावित असलेल्या पाच प्रकल्पांमुळे जलाशयाच्या पर्यावरणावर, पाणी साठ्यावर, मत्स्यव्यवसायावर तसेच परिसरातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

उजनी धरण हे केवळ पाण्याचे साठवण केंद्र नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. या जलाशयावर शेतकरी, मच्छीमार, धरणग्रस्त आणि परिसरातील अनेक घटक अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी शेतकरी आपल्या प्राणांची बाजी लावण्यासही मागे हटणार नाहीत, असा आक्रमक इशारा आंदोलकांनी दिला.

विशेष म्हणजे, उजनी धरणाच्या उभारणीसाठी कोणतेही योगदान नसताना केवळ राजकीय स्वार्थातून काही नेते या प्रकल्पांना समर्थन देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. उजनीच्या पाण्यावर ज्यांचा कोणताही हक्काचा संघर्ष नाही, त्यांनी उजनीच्या भवितव्याचे निर्णय घेण्याचा अधिकार गाजवू नये, अशी संतप्त भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

समर्थन करणाऱ्या नेतृत्वाचा दशक्रिया विधी करून निषेध!

या प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या नेतृत्वाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी उजनी जलाशय परिसरातील चिखलठाण येथील श्री कोटलिंग मंदिर परिसरात दशक्रिया करो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पसमर्थक नेतृत्वाला जनतेच्या रोषाची जाणीव करून देण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या आंदोलनाची माहिती आणि निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, संबंधित खात्यांचे मंत्री, जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी सोलापूर तसेच पोलीस प्रशासन करमाळा यांना पाठविण्यात आल्या आहेत.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते दिग्विजय बागल, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, जगताप गटाचे नेते दादासाहेब लबडे, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश सरडे, पाटील गटाचे नेते दत्ता गव्हाणे, धरणग्रस्तांचे नेते शिवाजी बंडगर, प्रकाश नलावडे, विलास वाघमारे यांच्यासह उजनी परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उजनी वाचवण्यासाठी आता संघर्ष अटळ!

उजनीच्या पाण्यावर जगणाऱ्या जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना राजकीय नेत्यांनी जनतेच्या भावनांशी खेळू नये. विकासाच्या नावाखाली उजनीचा आणि उजनीवर अवलंबून असलेल्या जनतेचा बळी दिला जाणार असेल, तर हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. आगामी आंदोलनातून शासनाला आणि प्रकल्पसमर्थक नेतृत्वाला जनतेच्या एकजुटीची ताकद दाखवून दिली जाईल, असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा