*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर या दुकानाला लागलेली आग शेजारील घरात पसरल्याने ही हृदयद्रावक दुर्घटना घडली.
या घटनेमुळे संपूर्ण येडशी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत दुकानाला लागून असलेल्या घरालाही वेढा घातला. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या दुर्घटनेत घरातील सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. या आगीत उत्तम त्रिंबक करंडे (वय ७५), चंद्रकला उत्तम करंडे (वय ७०), गोविंद उत्तम करंडे (वय ४७), ज्योती गोविंद करंडे (वय ४२), गायत्री गोविंद करंडे (वय १६) आणि सिद्धी गोविंद करंडे (वय १५) यांचा मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील दोन कोवळ्या मुलींसह ज्येष्ठ नागरिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा