*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
नवी दिल्ली : मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरीच्या माध्यमांतून निवडणुका जिंकण्याची चोरवाट आम्ही बंद करत आणली होती, हे बघून भाजपने ८५० लोकसभा मतदारसंघ निर्माण करून नवी पळवाट शोधून काढली आहे.
८५० मतदारसंघ म्हणजे लोकशाहीची आणि संविधानाची हत्या आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारच्या या कारस्थानाविरोधात संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी ‘जेन-झीं’ना केले.
प्रश्न महिला आरक्षणाचा नाहीच, ८५० लोकसभा मतदारसंघ करून देशातील राजकीय नकाशाच कायमस्वरुपी बदलण्याचा कुटील डाव भाजपने टाकला आहे. भाजपला कायमस्वरुपी सत्ता मिळवायची आहे. महिला आरक्षण विद्यमान जागांमध्ये ३३ टक्के जागा आरक्षित करूनही देता येऊ शकते. मग ते भाजप का देत नाही, असा प्रश्न राहुल गांधींंनी केला.
मतदारसंघ कोरले जातील…
आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मतदारसंघांच्या फेररचनेचे उदाहरण देऊन राहुल गांधींनी, भाजपवर अनुकूल मतदारसंघ जाणीवपूर्वक तयार करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला. आसाममध्ये मतदारसंघ कोरून काढले गेले, त्याचा मोठा लाभ भाजपला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळवला. देशभर भाजपला फायदेशीर लोकसभा मतदारसंघ निर्माण करून सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
‘इथेही ज्ञानेश कुमारच असतील ’
लोकसभा मतदारसंघांची फेररचनाही निष्पक्षपणे होणार नाही अशी भीतीही राहुल गांधींनी व्यक्त केली. फेररचनेसाठी आयोग स्थापन केला जाईल पण, त्यामध्ये मोदी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची वर्णी लावतील, ज्ञानेश कुमार स्वत:च्या मर्जीतील सदस्याची निवड करतील. मग, भाजपला हवे तसे मतदारसंघ निर्माण होतील. वास्तविक, विरोधकांचा प्रतिनिधी, सत्ताधार्यांचा प्रतिनिधी आणि निवृत्त न्यायाधीश असे सदस्य हवेत, असेही राहुल गांधी म्हणाले. १४ कोटी मतदार वगळले गेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केले असेल तर ही निवडणूकच अवैध ठरते, असा दावा राहुल गांधींनी केली.
२०२६ची जनगणना का नको?
२०२६च्या जनगणनेनंतर लोकसभा मतदारसंघांची फेररचना करण्याला भाजप का विरोध करत आहे, असा प्रश्न विचारून राहुल गांधींनी दलित-आदिवासी व ओबीसींवर अन्याय केला जात असल्याची टीका केली. २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघांची फेररचना होत असेल तर मागास समाजाला वाढीव लोकसंख्येननुसार प्रतिनिधित्व मिळणारच नाही. २५ वर्षे फेररचना स्थगित होणार असेल तर ४० वर्षांहून अधिक काळ दलित-आदिवासी-ओबीसींना वाढीव जागा मिळणार नाहीत, असे त्यांनी नमूद केले.
‘हुकुमशाहीसाठी कोरा चेक’
आमच्या आघाडीतील पक्ष एकत्र आहेत. पण, ज्यांना विधेयकाला पाठिंबा द्यायचा ते भाजपला सत्तेसाठी, हुकुमशाहीसाठी कोरा चेक लिहून देत आहेत हे लक्षात घ्या, अशी टिप्पणी राहुल गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व द्रमुकचे नाव न घेता केली. इंडिया आघाडीतील घटक पक्षच नव्हे तर, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देसम या आमच्या आघाडीत नसलेल्या पक्षांनाही मी सांगू इच्छितो की, ही लोकशाही टिकवण्यासाठीची लढाई आहे. विधेयकाला पाठिंबा देऊन लोकशाही नष्ट करत आहात, असा इशारा राहुल गांधींनी दिला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा