*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
देशात मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, यासाठी विरोधी पक्षांनाही साद घालण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला समर्थन देणार असल्याचे संकेत मिळत असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार भाजपाला साथ देण्याच्या विचारात असल्याच्या चर्चेमुळे पक्षात कालपासून राजीनामा सत्र सुरू झाले आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले आहेत. यामध्ये रामेश्वर खामकर, अभयसिंह जगताप आणि लक्ष्मण पाटील यांच्या राजीनाम्याच्या पोस्ट सध्या विशेष चर्चेत आहेत.
भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय पटला नाही
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार वेगळी भूमिका घेणार असल्याचे समोर येताच पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत. पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली, तरीही कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे माजी प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी सोशल मीडियावर राजीनामा पत्र शेअर केले असून, हा पक्षातील पहिला राजीनामा ठरला आहे.
“पक्षाने डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या मुद्द्यावर भाजपाला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासारख्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेचा पाईक असलेल्या कार्यकर्त्याच्या मनाला अजिबात पटणारा नाही”, असं त्यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
…तर आम्ही थांबलेले बरे
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे माण-खटाव विधानसभा अध्यक्ष व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, “ज्या पक्षाशी इतकी वर्षे प्रामाणिक राहिलो, त्या पक्षाला सर्वसामान्य कार्यकर्त्याची किंमत नाही असे वाटायला लागले आहे. आम्ही मतदारसंघात बलाढ्य विरोधकांशी लढतो आहोत आणि त्यामुळे आम्हाला जो त्रास होतो आहे, त्याची जराशी सुद्धा जाणीव न ठेवता आपला पक्ष सरळसरळ सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करत असेल, तर पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी लढायचे कशासाठी? आपली घरे जाळून, निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्याला मागे ठेवून आपण आम्हाला त्रास देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असाल, तर आम्ही थांबलेले बरे.”
शेवटी विचार महत्त्वाचा आहे, पक्ष नाही
तसेच, लक्ष्मण पाटील या कार्यकर्त्याची पोस्टही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. “आजपर्यंत शरद पवार साहेबांच्या सर्व निर्णयांचे (त्यातील काही निर्णय पटले नाहीत तरीही) समर्थन केले, पण आता मात्र हा निर्णय पुरोगामी विचारांच्या माझ्यासारख्या कोणत्याही कार्यकर्त्यास सहन करणे शक्य नाही! शेवटी विचार महत्त्वाचा आहे, पक्ष नाही,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आजपर्यंत शरद पवार साहेबांच्या सर्व निर्णयांचे (त्यातील काही निर्णय पटले नाहीत तरीही) समर्थन केले पण आता मात्र हा निर्णय पुरोगामी विचारांच्या माझ्यासारख्या कोणत्याही कार्यकर्त्यास सहन करणे शक्य नाही!
शेवटी विचार महत्त्वाचा आहे पक्ष नाही !!
– लक्ष्मण मारोतराव ईक्कर पाटील
दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला समर्थन देणार असल्याच्या वृत्तावर शरद पवार किंवा पक्षातील इतर महत्त्वाच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ही सर्व चर्चा केवळ जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानामुळे सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षाकडून प्रत्यक्षात काय भूमिका जाहीर होते आणि त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी व नेतेमंडळी काय पाऊल उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा