Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२६

'विद्यार्थ्याला मुलींचे कपडे घालण्यास भाग पाडले आणि दुसर्‍या मुलीला प्रपोज.'; नागपूरच्या नामवंत महाविद्यालयात संतापजनक प्रकार!

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


नागपूर : महाराष्ट्रात महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा, १९९९ अंतर्गत रॅगिंग हा दखलपात्र गुन्हा आहे. यामध्ये शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे, अपमान करणे किंवा इच्छेविरुद्ध कृत्य करण्यास भाग पाडणे यांचा समावेश होतो. दोषींवर वसतिगृहातून हकालपट्टी, महाविद्यालयातून निलंबन, दंड आणि फौजदारी कारवाई होऊ शकते. असे असतानाही नागपूरच्या शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीडीसीएच) वसतिगृहात रॅगिंगचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याला वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मुलींचे कपडे घालण्यास, सहकारी विद्यार्थ्याला प्रपोज करण्यास आणि मेसमधील उष्टे अन्न खाण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत हा छळ सुरू होता. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, महाविद्यालय प्रशासनाने प्राथमिक चौकशीनंतर तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढले आहे.

नेमका प्रकार काय?

पीडित विद्यार्थी उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील कमहरिया येथील रहिवासी आहे. नीट परीक्षेत देशात ५५२ वा क्रमांक मिळविल्यानंतर त्याने नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. २६ ऑक्टोबर रोजी तो वसतिगृहात राहण्यासाठी आला. त्याच रात्री साडेआठच्या सुमारास काही वरिष्ठ विद्यार्थी खोली क्रमांक १०४ मध्ये गेले आणि त्यांनी त्याचा छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराचे म्हणणे काय?

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, स्वतःला वर्गप्रतिनिधी (सीआर) म्हणवणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याला टोपी काढून डोके खाली घालण्यास सांगितले. त्यानंतर कोंबडा होणे, कपडे काढणे अशा प्रकारांना भाग पाडण्यात आले. त्याच्याशी अश्लील शेरेबाजी करून अनुचित स्पर्श केल्याचाही आरोप आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्याला मुलींचे कपडे घालण्यास सांगितले आणि त्याच अवस्थेत अन्य विद्यार्थ्याला प्रपोज करण्यास भाग पाडले. याशिवाय दारूची बाटली आणणे, खोली साफ करणे आणि मेसमधील उष्टे अन्न खाण्याची सक्ती करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अश्लील चित्रफिती दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, पीडित विद्यार्थ्याने यापूर्वीच महाविद्यालय प्रशासनाला ई-मेलद्वारे तक्रार करून अँटी रॅगिंग समिती आणि पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, वसतिगृहातील सीसीटीव्ही चित्रण मागितल्यानंतर प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या मावशीने केला आहे.

विभागाने घेतली दखल

या प्रकरणाची तक्रार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अँटी रॅगिंग हेल्पलाइनसह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडेही करण्यात आली आहे. वसतिगृहातील खोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी राहत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन वसतिगृहांमधील रॅगिंगविरोधी उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा