*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा प्रतिनिधी:उजनी धरण क्षेत्रातील प्रस्तावित तरंगता सोलार प्रकल्प, AI डेटा सेंटरसह अन्य घातक प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात प्रस्तावित असलेले तरंगता सोलार प्रकल्प, AI डेटा सेंटर यांसह इतर प्रकल्प रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी येत्या २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रांजणी ते उजनी धरण असा भव्य मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात परिसरातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, मच्छीमार बांधवांनी तसेच उजनीच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे ,उजनी धरण संवर्धन समितीचे अविनाश सरडे ,सौरभ आरकिले,संदीप माने, सचिन गावडे ,शंकर बोंद्रे ,अक्षय यादव ,योगेश सरडे ,गणेश वाघ, शंकर जाधव ,इनुस सय्यद आदी तरूणानी केले आहे.
उजनी धरणाच्या पाण्यावर आणि परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असताना प्रशासनाकडून अद्यापही नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका या आंदोलक तरूणांनी व्यक्त केली.
हा मशाल मोर्चा केवळ निषेध व्यक्त करण्यासाठी नसून प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी आणि आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या भवितव्याशी खेळणारे प्रस्तावित प्रकल्प रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
उजनी धरण हे हजारो कुटुंबांच्या जीवनाचा आधार आहे. त्यामुळे उजनीच्या अस्तित्वाचा प्रश्न हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून संपूर्ण परिसराच्या भवितव्याचा प्रश्न आहे. ही जाणीव ठेवून नागरिकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवत या मशाल मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा