*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
तुळजापूर शहरात १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. समीर जब्बार पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे. जुन्या कारणावरून तरुणाला घरी बोलावून त्याच्यावर मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याला अन्य ठिकाणी नेऊन गंभीर मारहाण
केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमधील
फिर्यादीच्या जबाबानुसार, समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉम. पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. काही महिन्यांपूर्वी एका मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याच्या कारणावरून समीर व
त्याच्या कुटुंबीयांना बोलावून समज देण्यात आली होती. त्यानंतर समीरने महाविद्यालयात जाणे बंद केले होते. दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी समीर दुपारी परीक्षेसाठी महाविद्यालयात गेला होता. सायंकाळी घरी परतल्यानंतर तो
आपल्या नातेवाइकांना आणण्यासाठी घाटशिळ पार्किंग परिसरात गेला होता. याचदरम्यान समीरला संतोष कदम यांनी त्यांच्या घरी नेल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर समीरचे वडील जब्बार पटेल संबंधित व्यक्तीच्या घरी
गेले. काही वेळाने समीरची आई व अन्य नातेवाईकही तेथे पोहोचले. त्यावेळी जुन्या कारणावरून समीरला मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. काही वेळाने संतोष कदम घराबाहेर जाऊन अन्य व्यक्तींना सोबत घेऊन आले. त्यांनी
समीरला जीवे मारण्याची धमकी देत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. आईने विरोध केला असता तिलाही शिवीगाळ व धमकी देण्यात आली. यावेळी समीरचा मोबाईलमधील सिमकार्ड काढून घेतल्याचा तसेच आईचा मोबाईलही हिसकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर आई वडिलांना घरातच थांबवून बाहेर जाण्यास मनाई केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, रात्री उशिरा कुटुंबीय घरी परतल्यानंतर नातेवाइकांचा शोध सुरू झाला. यावेळी अरबाज सैय्यद हा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या पाठ, पोट, मांडी, पाय आणि गालावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे.
त्याने दिलेल्या माहितीनुसार समीरलाही मारहाण करून भारतीबुवा मठाजवळील पार्किंग परिसरात टाकल्याचे समजले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या परिसरात शोध घेतला असता समीर एका चहाच्या टपरीजवळील लहान घराच्या बाजूला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०५७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), १०९(१), १४०(३), १८९(२), १९१ (२), १९१(३), १९०, ११५ (२), ३५२, ३५१ (२) आणि ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये संशयित आरोपी म्हणून संतोष देविदास कदम, संजय बिलास जाधव, गणेश देवकते, मस्के तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब रामचंद्र मांजरे यांनी गुन्हा नोंदवून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. दरम्यान, या घटनेतील सर्व संशयितांची भूमिका, तरुणाच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींचा पोलीस तपास सुरू आहे. एफआयआरमधील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असून या गंभीर प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे तुळजापूर शहराचे लक्ष लागले आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा