*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी रांजणी ते उजनी धरण या परिसरात काढण्यात आलेल्या मशाल मोर्चाबाबत प्रश्न विचारला. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी केलेल्या उपरोधिक टिप्पणीवरून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या वेदना, धरणग्रस्तांचे प्रश्न आणि मच्छीमारांच्या भवितव्याचा संघर्ष हा पालकमंत्र्यांसाठी उपहासाचा विषय आहे काय? असा संतप्त सवाल भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
उजनी धरण लाभक्षेत्रात प्रस्तावित असलेल्या एआय (AI), सौर ऊर्जा, अणुऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी, धरणग्रस्त, मच्छीमार आणि नागरिक आपल्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या जमिनी, पाणी, रोजगार, उपजीविका आणि भविष्यातील हक्कांच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने मशाल मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नव्हता, तर आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी उभारलेला जनआक्रोश होता.
अशा संवेदनशील आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी केलेली उपरोधिक टिप्पणी ही आंदोलनकर्त्यांच्या भावनांना दुखावणारी असल्याची भूमिका कांबळे यांनी मांडली.
पालकमंत्री हे केवळ सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी नसतात, तर संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेचे पालक असतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणे, आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे ही त्यांची घटनात्मक व नैतिक जबाबदारी आहे. मात्र, जनतेच्या आक्रोशाला उपरोधिक उत्तर देणे हे पालकमंत्री पदाच्या जबाबदारीशी सुसंगत नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना उत्तरेश्वर कांबळे म्हणाले की, "शेतकरी, धरणग्रस्त आणि मच्छीमार रस्त्यावर उतरतात, ते हौसेखातर नाही. त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असतो. आपल्या भविष्याची चिंता आणि अस्तित्वाची लढाई घेऊन ते आंदोलन करतात. अशा आंदोलनाची खिल्ली उडविण्याऐवजी पालकमंत्र्यांनी त्या आंदोलनामागील वेदना समजून घेणे अपेक्षित होते. सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर जनतेचा आवाज ऐकू येत नसेल, तर त्या पदाचा उपयोग काय?"
कांबळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
1. रांजणी ते उजनी धरण परिसरातील मशाल मोर्चाबाबत केलेल्या उपरोधिक वक्तव्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने जाहीर माफी मागावी.
2. शेतकरी, धरणग्रस्त, मच्छीमार आणि सर्व आंदोलनकर्त्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी.
3. उजनी धरण लाभक्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांच्या शंका, आक्षेप आणि मागण्यांवर स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
4. आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
अन्यथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर कायम ठेवण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणीही उत्तरेश्वर कांबळे यांनी केली.
लोकशाहीत आंदोलनाचा आकार नव्हे, तर आंदोलनामागील प्रश्न महत्त्वाचा असतो. मशाल मोर्चातील मशालींची संख्या मोजण्यापेक्षा त्या मशाली पेटण्यामागील जनतेच्या मनातील असंतोष समजून घेणे अधिक गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या आवाजाची थट्टा न करता त्या आवाजाला उत्तर देण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी ठाम भूमिका कांबळे यांनी व्यक्त केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा