Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२६

शहा ग्लोबल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवात खेळातून व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त आणि आत्मविश्वासाचा जागर, खेळामधून देखील करिअर करता येते : आंतरराष्ट्रीय धावपटू दीपक गावडे.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूर ( जि. पुणे ) येथील 

शहा ग्लोबल स्कूल मध्ये  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६–२७ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये  क्रीडागुणांना वाव देणे, त्यांच्यात खिलाडूवृत्ती, संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.



शहा ग्लोबल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कला, क्रीडा आणि इतर सुप्त गुणांच्या विकासाला प्राधान्य देत आले आहे. याच विचारातून या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले धावपटू दीपक मकरंद गावडे सर उपस्थित होते. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून इंदापूर आय एम ए चे अध्यक्ष तथा रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजित ठोबंरे आणि आयुर्वेदाचार्या, पंचकर्म तज्ज्ञ व संचालिका, इंदापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक डॉ. अश्विनी अभिजित ठोंबरे उपस्थित होते



कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ. वैष्णवी देशपांडे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाळेचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट केला. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर खेळ, कला, संस्कार आणि जीवनकौशल्ये यांचाही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असतो, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समीक्षा बुरले यांनी केले.

प्रमुख पाहुणे दीपक गावडे सर यांनी आपल्या क्रीडा प्रवासातील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. खेळात पारंगत असलेले विद्यार्थी आपले करिअर देखील करू शकतात.


 विद्यार्थ्यांनी "खेळ आणि शिक्षण यांची तुलना करू नये. जसे शैक्षणिक गुण महत्त्वाचे आहेत, तसेच मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ देखील  जीवनात महत्त्वपूर्ण आहे."

खेळाने मला जीवनाला दिशा दिली आणि आयुष्यातील अनेक पैलू समजून घेण्याची संधी दिली, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात मेहनत घेण्याचे आवाहन केले.



यावेळी डॉ. अभिजित ठोंबरे म्हणाले, युवापिढी ही राष्ट्रीय संपत्ती असून विद्यार्थ्यांचे मन, मेंदू आणि मनगट देखील मजबूत असणे ही काळाची गरज आहे. आरोग्य हे बाजारात विकत मिळत नसल्याने आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम आरोग्य, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली यांचा अंगीकार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. 

जायंट्स ग्रुप ऑफ इंद्रेश्वर, इंदापूर च्या संचालिका डॉ. अश्विनी ठोंबरे यांनी आजच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर विचार मांडले. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालकांनी त्यांना वेळ देणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या आवडी-निवडी समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेचे व्यवस्थापन सदस्य  अंगद शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विजय आणि पराभव या दोन्ही गोष्टींचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी

हर जीत ही महत्त्वाची असते. विजय आपल्याला आनंद देतो, तर पराभव आपल्याला शिकवण देतो. प्रयत्न करत राहा, अपयशाला घाबरू नका."

यावेळी व्यवस्थापन सदस्य  मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष सौ. अंकिता मुकुंद शहा, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, अंगद शहा आणि सौ. रुचिरा शहा हे मान्यवर उपस्थित होते. 

पहिल्या दिवशी उपस्थित प्री-प्रायमरी आणि प्रायमरी विभागातील पालकांच्या साक्षीने विद्यार्थ्यांच्या ५० मीटर अडथळा शर्यत, ८० मीटर अडथळा शर्यत,

१०० मीटर धावण्याची स्पर्धा, मनोरंजक खेळ,

सांघिक खेळ, खो-खो,

रिले रेस आदी विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कौशल्य, चपळता, जिद्द आणि संघभावना यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी खेळांचा जल्लोष आणि पारितोषिक वितरण समारंभ प्रमोद शहा, सौ. सारिका शहा आणि सौ. प्रियांका शहा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.  स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे आणि पदके देऊन गौरविण्यात आले. सांघिक खेळांमधील विजेत्या संघांना प्रमाणपत्रे आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, सहकाऱ्यांचा उत्साह आणि प्रत्येक विद्यार्थ्याने दाखवलेली खिलाडू वृत्ती यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.

या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत शाळेचे स्पोर्ट्स इन्चार्ज  संकेत माने यांचे विशेष योगदान लाभले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आयोजन समितीने उत्तम समन्वय साधत कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सौ. अमृता चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. शहा ग्लोबल स्कूलचा हा क्रीडा महोत्सव म्हणजे केवळ खेळांचा उत्सव नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची देणारा आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा एक अविस्मरणीय अनुभव होता. कारण आमचा विश्वास आहे की मैदानावर घडणारे खेळाडू केवळ पदके जिंकत नाहीत, तर आयुष्याच्या मैदानावर लढण्याची ताकद देखील मिळवतात असे शेवटी अंगद शहा यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा