इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कथित मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी हजारो नागरिकांनी इंदापूर तहसील कार्यालयावर दिनांक २५ नोव्हेंबर रोजी उस्फुर्त मोर्चा काढला.
इंदापूर नगरपरिषद प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सुरू झालेला मोर्चा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रशासकीय भवनावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार हटाव यासह विविध फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत विविध ध्वजासह लक्षवेधी काढलेल्या मोर्चाचे शेवट सभेत रूपांतर झाले.
यावेळी भाजपचे प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख नितीन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा संपन्न झाला. यावेळी प्रांताधिकारी
उत्तम दिघे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करण्यात आली.
यावेळी प्रदीप गारटकर,
म्हणाले, प्रशासन माजले की जनतेत असंतोष निर्माण होऊन उठाव होतो. मात्र इंदापुरात प्रशासन भ्रष्ट लोकांच्या पाठीशी उभे राहत असून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांचे ऐकण्याऐवजी ते फक्त भारणेवाडीचेच ऐकतात. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी, त्यांना न्याय देण्यासाठी तहसील कार्यालयाजवळच कार्यालय उभे करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत, त्यांच्या हातात प्रशासन व कायदा आहे. मात्र मिळालेल्या अधिकारांचा वापर जनतेची सेवा करण्यासाठी झाला पाहिजे, तो होत नाही. इंदापूर तहसील कार्यालयात शेतरस्ते, पाणंद रस्ते, वहिवाटीच्या रस्त्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून या प्रकरणांची वेळेत सुनावणी करून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कायद्यानुसार निर्णय द्यावेत, प्रलंबित प्रकरणांची यादी सार्वजनिक करावी. प्रत्येक प्रकरणासाठी निकालाची कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसह महसूल विभागातील कामांमध्येही सामान्य नागरिकांची अडवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले. सोनाई डेअरी कराच्या स्वरूपात शासनाकडे सहाशे कोटी रुपये भरते, रशियासह ४० देशात आपले उत्पादन पाठवते, प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे हजारो लोकांना रोजगार देते. त्यामुळे मोर्चा तहसीलदार कारभार विरोधात असताना देखील सोनाई डेअरी वर राग व्यक्त करणाऱ्यांना त्यांनी सोनाई सारखी डेअरी उभी करून शेतकरी, युवापिढीस न्याय देण्याचे आव्हान दिले. तालुक्यातील सत्ताधारी ग्रामीण नक्षलवाद वाढवत असल्याचा आरोप करत तालुका प्रशासन भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त तसेच सन्मानयुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.
भाजपचे युवा नेते प्रवीण माने म्हणाले, आज तुम्हा सर्वांना उन्हात यावे लागले, बसावे लागले याला जबाबदार तहसीलदार कारभार आहे. आमचा मोर्चा एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर नागरिकांना हेलपाटे मारण्यास लावणाऱ्यांच्या विरोधात आहे, जनतेवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात आहे. काही जणांची स्थळ पाहणी न करता निर्णय दिले गेले तर काहींना दोन वर्ष झाले तरी निर्णय दिले गेले नाहीत. जनतेचे प्रश्न न सुटल्यास या पेक्षा देखील मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी शेवटी दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत बनसुडे, भाजप जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महारुद्र पाटील, अमोल भिसे, भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे तानाजी धोत्रे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, दलित महासंघाचे नितीन सरवदे, ॲड आशुतोष भोसले, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नितीन शिंदे, रयत क्रांती संघटनेचे नीलेश देवकर, यांच्यासह अन्य वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते अनिल पवार, किरण गानबोटे, अतुल शेटे पाटील, अभिजित तांबिले, आशू गानबोटे, अमोल मुळे,
सागर गानबोटे, वासिम बागवान, संजय शिंदे, सागर पवार, लखन जगताप, नितीन आरडे, संतोष मोरे, उमा इंगुले , रंजना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन अनिल राऊत यांनी केले.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा