Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ नोव्हेंबर, २०२६

ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या ‘बळीराजा आधार अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प!

 *मुख्य संपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*



बहुजन हिताय वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद; पाणीबचत, पालकांच्या कष्टांची जाणीव आणि संविधान अभ्यासाचा निर्धार

उमरगा (प्रतिनिधी) : ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘बळीराजा आधार अभियान २०२६-२७’ अंतर्गत शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी उमरगा शहरातील बहुजन हिताय वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्यासह पाणीबचत, आर्थिक समजूतदारपणा आणि संविधान अभ्यासाचे संकल्प विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या केले.

दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ऍड. शीतल चव्हाण यांनी पाण्याचे महत्त्व, पालकांचे कष्ट, कुटुंबाचे आर्थिक नियोजन आणि विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.

यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करू, पाण्याचा अपव्यय टाळू, आई-वडिलांकडे पैसे किंवा चैनीच्या वस्तूंसाठी हट्ट धरणार नाही, कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडणार नाही याची काळजी घेऊ आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये भारतीय संविधान समजून घेण्याचा प्रयत्न करू, असे संकल्प विद्यार्थ्यांसह सामूहिकरीत्या करण्यात आले.

दुष्काळाशी सामना करताना केवळ आर्थिक मदत आणि जलसंधारणाच्या उपाययोजनाच महत्त्वाच्या नसून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, विवेकशीलता, सामाजिक जबाबदारी आणि पालकांच्या कष्टांविषयी आदर निर्माण होणेही तितकेच आवश्यक आहे. संकटाच्या काळात प्रत्येकाने आपल्या गरजा आणि उपलब्ध साधनसंपत्ती यांचा विचार करून जबाबदारीने वागले पाहिजे, असे मत ऍड. शीतल चव्हाण यांनी व्यक्त केले.

यावेळी बहुजन हिताय वसतिगृहाचे संचालक धम्मचारी प्रज्ञाजीत, मायक्रोकॉम कॉम्प्युटरचे प्रा. युसूफ मुल्ला, प्रा. राजू बटगिरे, किशोर बसगुंडे व विजय चितली आदी उपस्थित होते.

ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या ‘बळीराजा आधार अभियान’ अंतर्गत दुष्काळग्रस्त कुटुंबांना आधार देण्याबरोबरच जलसंधारण, लोकसहभाग आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा