*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे डीपी चोरांच्या टोळीचे धाबे दणाणले आहे. (दि.६ नोव्हेंबर २०२६) रोजी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण ढुके व पोलीस अंमलदार लहानु बांगर हे अरणगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी अरणगाव व उरळगाव गावच्या शिवेवर विद्युत रोहित्र चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांना स्थानिकांकडून मिळाली. पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देत परिसरात संशयितांचा शोध सुरू केला. दरम्यान, विनानंबर प्लेटच्या पल्सर मोटारसायकलवरून जाणारे दोघे संशयास्पद दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच त्यांनी मोटारसायकलचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर दोघांनी मोटारसायकल सोडून अंधाराचा फायदा घेत उसाच्या शेतात धूम ठोकली.
पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेतात शोधमोहीम राबवली. अखेर सकाळी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २७) व सुनील पोपट केदार (वय २५, दोघे रा.नांदूर, खंदारमळा, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) अशी त्यांची नावे आहेत. चौकशीत त्यांनी डीपीमधील तांब्याच्या तारा चोरण्यासाठी आल्याची कबुली दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळविण्यात आली. या काळात पोलिसांनी सखोल तपास केला असता, या चोरीच्या घटनांमध्ये आणखी तीन साथीदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. संदीप यशवंत काळे (वय २३), निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ (वय २१, दोघे रा.नांदूर, खंदारमळा, ता.संगमनेर) आणि राजेंद्र सोमनाथ वर्पे (वय ३२, रा. वरवंडी, थापलीवस्ती खंडोबा, ता.संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. पथकांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी पहिल्या दोघांच्या साथीने शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणचे विद्युत रोहित्र रात्रीच्या वेळी खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पाचही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या १७० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत. या मुद्देमालाची किंमत २ लाख २९ हजार ५०० रुपये आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार व शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक फौजदार लहानु बांगर, पोलीस हवालदार किरण ढुके, रोहिदास पास्त्रे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे तसेच पोलीस अंमलदार भारत भोसले, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे व योगेश भंडारे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास किरण ढुके व भारत भोसले करीत आहेत.
चौकट:
*'नागरिकांच्या सतर्कतेला पोलिसांची शाबासकी!*
डीपी चोरांना पकडण्यासाठी मोलाची मदत करणाऱ्या उरळगावच्या संतोष सात्रस, विनायक सात्रस, लहू हुजगे, निलेश सात्रस, काळुराम चोरमले व संजय चोरमले या सहा नागरिकांचा उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेचे यादव यांनी विशेष कौतुक केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा