Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

एन. पी. इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा - संतोष मोरे


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147


                          श्रीकांत मोरे यांच्या अकस्मात मयत प्रकरणाची चौकशी करुन एन. पी. इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे यांनी निवेदनाद्वारे इंदापूरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. 

     संतोष मोरे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीकांत विठ्ठल मोरे (वय ३२ वर्षे, रा. देवडे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हा इसम दि. १७/०९/२०२३ रोजी रात्री ९ वाजून १० मिनीटांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मरण पावला. इंदापूर पोलीस ठाण्याच्या अकस्मात मयत दप्तरी नोंद करण्यात आली आहे. सदर इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण देण्यात आलेले नाही.

    पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम देशपांडे व्हेज हॉटेलजवळ सुरु आहे. सदरचे काम करणा-या एन. पी. इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. कंपनीने त्या भागात अनेक ठिकाणी खड्डे घेतलेले आहेत. सदरील खड्ड्यांमध्ये दुचाकीसह पडल्याने श्रीकांत मोरे गंभीर जखमी होवून मयत झाले असल्याचा संतोष मोरे यांचा दावा आहे. रस्त्याचे काम सुरु असताना कंपनीने कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने मोरे यांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यांच्या मृत्युस सर्वस्वी एन. पी. इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. कंपनीच जबाबदार आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होवून कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मार्गावरुन ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या जिवीतास हेतूपुरस्पर जीवघेणा धोका निर्माण केल्याच्या करणावरुन ही गुन्हा दाखल करण्यात यावा. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून मयत व्यक्तीच्या कुटूंबाला न्याय मिळवून दयावा अशी मागणी संतोष मोरे यांनी केली आहे.

    एन.पी. इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. ही कंपनी ज्या वेळेपासून चालू झाली त्या वेळेपासूनच वादग्रस्त होत चाललेली आहे. तिच्या विरोधात सुमारे दीडशेहून जास्त तक्रारी महसूल व खनिकर्म विभागाच्या टेबलवर धूळ खात पडले आहेत. आत्तातर नवीन प्रकरण उद्भवल्यामुळे कंपनीविषयीच्या बदलौकिकात अधिकची भर पडल्याचे चित्र आहे. सदर निवेदनाच्या प्रती सर्व संबंधितांकडे पाठवण्यात आल्या आहेत.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा