ॲड-- शितल शामराव चव्हाण
मो;---9921 657 346
(१) सरकारच्या नोकऱ्यांतील कंत्राटीकरण आणि सार्वजनिक उद्योग, सेवा-सुविधा आदी ठिकाणच्या खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध करावा. कारण, कंत्राटीकरण आणि खाजगीकरण आले तर आरक्षण मिळून देखील त्याचा काहीही लाभ होणार नाही.
(२) राजकारणात मराठा समाजातील कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य घरातील तरुणांना पुढे आणावे. राजकारणातील धनिक, जमीनदार, गब्बर मराठ्यांचे अघोषित आरक्षण आधी संपवावे आणि त्याठिकाणी सर्वसामान्य मराठे कसे येतील यासाठी एकजूटीने प्रयत्न करावेत.
(३) आपापसात शेतीच्या, बांधाच्या, अतिक्रमणाच्या, व्यक्तिगत हेव्यादाव्यांच्या विषयावरील वाद एकजूटीने मिटवावेत. परस्परांना सहकार्य करावे.
(४) उद्योगधंदे, प्रयोगशील व आर्थिक लाभ देणारी शेती करावी. तेलंगणा या राज्यात शेतकऱ्यांसाठी अतिशय माफक दरात २४ तास वीजपुरवठा केला जातो. तशी मागणी महाराष्ट्रातही लावून धरावी. केवळ निसर्गावर अवलंबून असलेले शेतकरी देशोधडीस लागले आहेत. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान दिडपट हमीभाव देण्याची मागणीही लावून धरावी. आजघडीला पिकांच्या उत्पादनाचा खर्च आणि मिळणारा भाव पाहिला तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही.
(५) आपल्या मुलांना परदेशात शिकायला व नोकरीला पाठवता येत असेल तर बिनधास्त पाठवावे. तो विदेशी होईल असा संकुचित विचार करु नये. आपल्या लेकरांना इंग्रजी शिकवण्यासही संकोच करु नये. मराठी भाषा शिकवावी. मराठी साहित्य वाचायला लावावे. पण मराठीचा दुराभिमान बाळगून इंग्रजीचा दुस्वास करु नये.
(५) शैक्षणिक अभ्यासक्रमासह अवांतर वाचन, विविध कलागुण आपल्या पाल्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ गुणपत्रकावरील गुण वाढवण्याच्या अघोरी स्पर्धेत आपल्या पाल्यांना ढकलून बेजार न करता त्याला ज्ञानवंत, कलावंत आणि संवेदनशील बनवावे.
(६) तंबाखू, सिगारेट, दारु, गांजा-चरस यांच्या अतिसेवनाने मराठा समाजातील अनेक तरुण अविवाहित राहत आहेत. अनेक तरुण अकाली मरण पावत आहेत. या अपप्रवृत्तींना टाळण्यासाठी चळवळ उभी करावी.
(७) पोकळ बडेजावापोटी होणारे खर्च टाळावेत. कमाई आणि खर्च यातील ताळमेळ साधावा. जीवनविमा, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स, म्युच्युअल फंड, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, घट्ट सोने, चांदी, जमीन, शहरातील फ्लॅट्स अशा स्वरुपात आपल्या कमाईतील काही भाग गुंतवत रहावे. थेंबा थेंबाने तळे साचते तशी आजची छोटी वाटणारी गुंतवणूक भविष्यात मोठ्या स्वरुपात कामाला येते. भावांनी आपल्या बहिणींना रक्षाबंधन, भाऊबीजेला साड्या व गिफ्ट्स ऐवजी गुंजभर का असेना पण सोने द्यावे, भरपूर पुस्तके द्यावीत, किंवा भविष्यात मुल्यवृद्धी होईल असे काही द्यावे.
(८) आपल्या पाल्यांना मैदानी खेळ, योगासने व प्राणायम, सायकलिंग, पोहणे शिकवावे. आरोग्य संवर्धनाचे संस्कार करावेत.
(९) मराठा समाजातील गोरगरीबांना शिक्षण, नोकऱ्या, उद्योगधंदे, दवाखाना इत्यादी बाबतीत अत्यल्प व्याजदरात वित्त पुरवठा करणाऱ्या तालुकागणिक संस्था निर्माण कराव्यात. या संस्थांना मराठा समाजातील उद्योजक, राजकारणी, मोठे शेतकरी यांनी सढळ हाताने पैसा द्यावा.
(१०) अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ठ चालीरीती यातून बाहेर पडावे. नव्या जगातील चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात. जीवन सर्वांगाने आनंदी, निरामय, उल्हासपूर्ण जगण्याचे संस्कार आपल्या पाल्यांवर करावेत. इतर जाती, धर्मीयांचा द्वेष करु नये. हुर्रेगीरी करु नये. एखाद्या पक्षाची अथवा नेत्याची स्वाभिमान गहाण टाकून झेलणी, चाटुगिरी करु नये. जात, धर्म, पक्ष, नेता यासाठी दंगली, मारामाऱ्या, हुल्लडबाजी, टवाळखोरी करु नये. स्वत:सह सकलांचा समभावाने विचार करावा.
आरक्षणाची लढाई ही महत्वाची आहेच. पण त्या जोडीला वरील बाबी पाळल्या तर समाजाचे कल्याण होईल. समाज खऱ्या अर्थाने पुढारेल आणि इतर समाजाला आपल्या भावंडाप्रमाणे सोबत घेवून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता रुजवू शकेल.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा