इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
"कसली आली दिवाळी आणि कसल काय दिवसभर कष्ट केले तरच भाकरी मिळते. त्यामुळे दिवाळी काय, हे आम्हाला माहीतच नाही, दिवाळी आमच्यासाठी नाही तर ती श्रीमंतसाठी आहे," असे ऊसतोड मजूर अक्काबाई सोनवणे व सुरेखा पवार (नंदुरबार) यांनी आपली व्यथा व्यक्त केली.
इंदापूर तालुक्यात पोटाची खळगी भरण्यासाठी धुळे, नंदुरबार, नगर, यवतमाळ, वाशिम, आष्टी, पाटोदा, गेवराई, जळगाव, बीड, माजलगाव या बरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेशमधूनही ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. त्यांची यंदाची दिवाळी उसाच्या फडातच साजरी होताना दिसत आहे. एकीकडे घरोघरी आकाश कंदिल व लाईटिंग झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी, घरी केलेल्या खमंग खाद्य पदार्थांचा सुवास ओसंडून वाहत असतानाच दुसरीकडे मात्र ऊसतोड मजुरांचा दररोजचा दिनक्रमाचा विरोधाभासी चित्र पाहून हृदयद्रावक मन हेलावून जात आहे.
यावर्षी गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर, कर्मयोगी शंकरराव पाटील बिजवडी, बारामती ॲग्रो शेटफळगढे, सहकार महर्षी कारखाना शंकरनगर, सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर, पांडुरंग सहकारी श्रीपूर, विठ्ठल सहकारी गंगामाई नगर या कारखान्यांनी मात्र गाळप सुरू करून बाजी मारली आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यातील चांगल्या प्रतीचा ऊस तालुक्यातील किंवा पर जिल्ह्यातील कारखाने सध्यातरी उचलत आहेत.
यावर्षी पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम थोड्या कालावधीचा असल्यामुळे प्रथमच थोडे थोडकेच ऊसतोड मजूर मुलाबाळांसह दाखल झाले आहेत. त्यामुळे आलेल्या मजुरांना दिवाळी उसाच्या फडात साजरी करावी लागत आहे.
संघर्ष आमच्या पाचवीलाच पूजलेला....
ऊसतोड मजूर ऊन, पाऊस, वारा, थंडी या कशाचीही पर्वा न करता कष्टाचे व कसरतीचे काम करत आहेत. सर्व आटापिटा घेतलेली उचल फेडण्यासाठीच असतो. या ऊसतोड कामगारांचा संपूर्ण दिवस उसाच्या फडात जातो. पोटासाठीचा संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजला असल्याची ऊसतोड मजूर संगिता सोनवणे व राणी मोरे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथे ऐन दिवाळीच्या सणामध्ये ऊसतोड महिला दिवाळी ऐवजी ऊस तोडून भरण्यात दंग आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा