*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
प्रा.इंद्रजित पाटील लिखित ' शेलक्या बारा ' कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे. बारा कथांचा अंतर्भाव या संग्रहात असल्याचे शीर्षक वाचता क्षणी लक्षात येते.तसेच अस्सल बोलीभाषेतील बाज, कथानकातील इरसालपणा ठासून भरलेला आहे.
गठुडी,बदकन,म्हसरं,
ईचुकाटा,कडब्याचा गळाटा,कालवण,हिर, कुच्चरवट्टा,वावर,जितराबं,फुफूटा अशा ग्रामीण शब्दांचा वापर लक्षवेधी ठरला आहे.
गावगाड्यातील दैनंदिन जीवनातील अनेक पदर प्रा.इंद्रजित पाटील यांनी चिकित्सकपणे हाताळले आहेत. कथानकातील जवळपास सर्वच पात्रे लेखकाच्या जीवनानुभवाशी साधर्म्य असणारी वाटतात. अगदी आयुष्यातील सगेसोयरे असल्यासारखी वाटतात.
' वाट ' ही पहिली कथा शेतकरी जीवनातील संघर्ष उभी करणारी आहे.शेतशिवारातील वहिवाट हा बैलगाडीसाठी रस्ता. परंतु मुजोर वृत्तीने गरीब शेतकऱ्यांची कोंडी केली जाते.
' बप्पांची वैचारिक लढाई तर अंकुशाचा मनगट नेटाचा लढा ' हा संघर्ष अतिशय यथार्थपणे रेखाटताना ग्रामीण भाषेचा चपखल, प्रवाही वापर वाचकांना बांधून ठेवतो.
पालमांडी संस्कृती हा सामाजिक व्यवस्थेतील एक विदारक अविभाज्य भाग आहे.
' चांगुणा ' ही कथा अशा भटकंती जिप्सी समुदायाची प्रतिनिधित्व करणारी आहे.लक्ष्या कुटूंब कबीला चरितार्थासाठी गावाबाहेर पाल मांडतो. त्याच गावातील पाटलाचा पोर त्याच्या बहिणीला श्रीमंतीच्या जाळ्यात अडकवून बलात्कार करतो व आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो. ही हृदय पिळवटून टाकणारी कथा मन सुन्न करून टाकते.
सदर कथासंग्रहात लेखकाने आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून खेड्यातील आर्थिक विषमतेवर सणसणीत चपराक ओढली आहे.
लेखकाने सामाजिक दंभावर प्रहार करणाऱ्या,स्त्रियांचे शोषण,व्यथा,वेदनांवर अभ्यासपूर्ण ओरखडे ओढले आहेत.महिला समाजात कुठल्याही बिंदूवर उभी राहिली तरी तिच्याकडे पाहण्याची समाजकंटकाची वखवखलेली दृष्टी डंख मारतेच मारते.या मनोवृत्तीचे भेदक चित्रण पाटील यांनी कलामाय,राखीचे बंधन, आक्काचं कुंकू,नाठाळ नाऱ्या सारख्या कथांमधून उभे केले आहे.
या कथा वाचकांसाठी स्रीमुक्तीच्या अनुषंगाने विचारप्रवर्तक तर आहेतच,स्त्री सन्मान व समानतेच्या पुरस्कार वाटेला जाण्यासाठी प्रवृत्त करतात हे मोठे यश आहे.
परिवर्तनवादी
चळवळीला बळ देणारी, परिवर्तन हे अटळ आहे हे निर्विवाद सत्य मांडणारी ' खंडूचं लगीन ' ही सुधारणावादी कथा आहे. मनुला गोंजारणारा गाव बौद्धवाड्यातील खंडूच्या लग्नात सदभावनेतून सहभागी होतो.त्याच्या विधवा आईची गावचे पाटील श्रीपती वडिलकीने पाठराखण करतात. वऱ्हाडी मंडळीत भांडणतंटे होऊनही गावात सौहार्दतेचे संबंध जोपासत लगीन पार पडते.सगुणाचे जीवन सार्थकी लागते.
कथेतील पात्रे,
प्रसंग,कथानक शिक्षणापासून वंचित समाजघटकाची अधोगतीची,अप्रगतीची अनुभूती देणारी आहेत.
' शेलक्या ' शब्दात सांगायचे तर प्रा.इंद्रजित पाटील यांच्या प्रवाही कथन शैलीतील धुरळा,दादाचा दोस्त,टिटवीतली माय, बाबा,तुम्ही बरोबर होता,बासूभाईची वारी या सर्व कथा वास्तवदर्शी सामाजिक संदर्भ असल्याने तद्वतच बोलीभाषेतील गोडवा ओठावर रेंगाळत वाचकांना शेवटपर्यंत बांधून ठेवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत .वाचक त्या-त्या प्रसंग,पात्रांशी तादात्म्य पावतो,समरस होतो.ही मोठी उपलब्धी म्हणता येईल.
सर्व समाज घटकांना सामावून व्यवस्था बदलण्यासाठी लिहिलेल्या कथा समाजहितैषी आहेत. लोकशिक्षकाच्या सकस लेखणीतून साकारलेली आंतरिक ऊर्मी वाचकांना नक्कीच प्रत्ययास येईल.यात तिळमात्र शंका नाही.
' साहित्य समाजाचा आरसा असतो.' सामाजिक अभ्युदयाची ताकद साहित्यात असते.या अर्थी हा कथासंग्रह तंतोतंत कसोटीला उतरला आहे.
' राखीचे बंधन ' या कथेतील हतबल, सासरच्या जाचात भरडलेली पोटुशी सावित्री. तिच्या जीवघेण्या खडतर प्रवासात बंधुरायाचे कर्तव्य पार पाडणारा आप्पा.नंतर आप्पाच्या समाधीला न चुकता राखी बांधून परतफेड करणारी आक्का ही हृदयस्पर्शी कथा मन हेलावून टाकणारी आहे.
भाऊ-भावजयला आपल्याच घरात तटस्थ मोलकरीण व घरगड्याची वागणूक देणाऱ्या कुटूंबातील सदस्यांची मतलबी वृती व सख्या नात्यातील दुरावाही घुसमट व्यक्त करणारी ' आक्काचं कुंकू ' ही मर्मबंधातली कथा आहे.अशा कुटूंबातील,नात्यातील उसवलेली वीण घट्ट करणाऱ्या कथांचा अंतर्भाव खचितच शेलक्या बाराची उंची वाढवणारा आहे.
प्रा.इंद्रजित पाटील यांचा पिंड कवी मनाचा असल्याने काव्यपंक्तीचा चपखल वापर वाचकांना भुरळ घालतो.
' धुरळा ' कथेचा शेवट -----
प्रेमात पडते अग्नीत जळते
बेचैन जीवास सारेच कळते
पालवी झडते पापणी उडते
उठताच वादळ नारी रडते
वेगळी वाट नखराच निराळा
परी जीवनी या उडतो धुरळा
हा एक अभिनव प्रयोग करून वाचक रसिकांना सुखद अनुभव दिला आहे.
एकंदर साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकून आपला आगळावेगळा ठसा उमटविण्यात लेखक प्रा. इंद्रजित पाटील यशस्वी झाले आहेत.वाचक, रसिक व अभ्यासक ' शेलक्या बारा ' चे मनापासून स्वागत करतीलच या अपेक्षेत,
सरांना पुढील वाटचालीसाठी आभाळभरून शुभेच्छा!
विद्रोही कवी
श्री.साहेबराव माेरे
माे.नं.- ९४०४०४८६०१
चाळीसगाव/जळगाव
कथासंग्रह - शेलक्या बारा
लेखक - इंद्रजित पाटील
प्रकाशन - स म ग्र प्रकाशन, तुळजापूर
किंमत - २२५ रू.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा