इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग व भजन स्पर्धे'ला इंदापूर येथे मोठ्या उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून या स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून इंदापूर तालुक्यातील पहिल्याच स्पर्धेत ४१ भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. येथे विजेत्या ठरलेल्या प्रथम दोन भजनी मंडळांची १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम सर्धेत निवड झाली आहे.
इंदापूर येथील या स्पर्धेत निमगाव केतकी येथील विठ्ठल भजनी मंडळ प्रथम क्रमांक, कांदलगाव येथील दत्त प्रासादिक भजनी मंडळ द्वितीय क्रमांक व म्हसोबाचीवाडी येथील यशवंत प्रासादिक भजनी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला तर इंदापूर येथील कुलस्वामिनी भजनी मंडळ, बेडशिंगे येथील संत जनाबाई भजनी मंडळ, सरस्वती भजनी मंडळ, सरस्वती संगीत विद्यालय, पद्मावती प्रासादिक भजनी मंडळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
या सर्व विजयी भजनी मंडळाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले असून अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इंदापूर येथील स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर, समन्वयक विवेक थिटे, संदीप राक्षे, इंदापूर तालुका संयोजक अमोल गोळे, रजनीकांत भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्वांचे सुळे यांनी आभार मानले आहेत. यापुढील पुरंदर तालुक्यासाठीची स्पर्धा २ फेब्रुवारी रोजी सासवड येथे होणार आहे, या स्पर्धेत जास्तीत जास्त भजनी मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा