Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ मे, २०२४

देशात भाजपा विरोधी लाट, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना दोन दिवसात त्यांची जागा दाखवू : शरद पवार

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

--- ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील, तर तुम्ही चिंता करू नका. हा शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. इंदापूर तालुक्यात कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू. मात्र देशात भाजपा विरोधी लाट आहे असे प्रतिपादन करत शरद पवार यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला.

 बारामती लोकसभा मतदार संघ निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा झाली.

 शरद पवार पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आमच्या पक्षाला सहकार्य करण्याची इच्छा आहे. मात्र तसे केल्यास त्यांच्या शेतीचे पाणी बंद करण्याची धमकी दिली जात आहे. शेतीचे पाणी हे काही बापजाद्याची इस्टेट नाही. कुणी नोकरी टिकणार नाही म्हणतात. दमदाटी व दहशतीने त्यांना हव्या त्या रस्त्याने लोकांना नेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.काही जणांना शक्ती व पाठिंबा देण्याची गरज असते, तशी भूमिका आम्ही घेतली. आज त्यांचे पाय जमिनीवर नाहीत. पाय आणि डोके हवेत आहे, अशा शब्दात पवार यांनी अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.

 जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करण्याची आज नितांत आवश्‍यकता आहे. ती यशस्वीपणे करायची असेल तर भाजपचा निर्णायक पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही. महाराष्ट्रातील लोकांना बदल हवा आहे. त्यांना भाजपला सत्तेतून बाजुला करुन नव्या विचारांच्या हातामध्ये तो बदल द्यायचा आहे. सर्वांच्या सामुदायिक शक्तीने आज इंदापूर तालुक्यात तुमच्या हातात निश्चित सत्ता येईल यात काही शंका नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

 सुप्रिया सुळे म्हणाल्या, दौंड व इंदापूरात पाण्या बद्दल प्रचंड भाषणे होत आहेत. कुणी पाण्याची धमकी दिली, तर त्याचा नंबर मला पाठवा. हे कुणाच्या घरचं पाणी नाही.तो राज्याचा विषय आहे. पाण्यावर सरकारचा नाही, तर देशातील शेतकऱ्याचा पहिला अधिकार आहे. चारशे पारच्या निमित्ताने संविधान बदलण्याचे पाप विरोधकांच्या मनात आहे. यातून पाणी बंद करू वगैरे भाषणे होत आहेत, अशा त्या म्हणाल्या.

  अमोल कोल्हे म्हणाले, नीती व नियत गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. शरद पवार यांनी शेतक-यांची ७१ हजार कोटी रुपयांची कर्ज माफी केली. भोपाळ मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्या तरी वेगळ्या विषयात ७० हजार कोटीचा आकडा सांगितला, त्यावर काहींनी आपली भूमिका बदलली.मात्र दबाव आला तरी सुद्धा हा महाराष्ट्र स्वाभिमानाने लढतो, हे अनिल देशमुख यांनी दाखवून दिले.

    भूषणसिंह होळकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे होते. हिंमत असेल तर मोदी यांनी रामाच्या नावावर मते मागण्या पेक्षा कामाच्या नावावर मते मागावीत असे आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.

 यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, इकडे असताना अजितदादा सर्व निर्णय घेत होते मात्र तिकडे गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय कुठेही सही करता येत नाही किंवा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे अजितदादा यांच्या नावातील दादा गायब झाला आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून इंदापूर तालुक्यातून दीड लाख मताधिक्य घेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, जेष्ठ नेते अशोक घोगरे आदींची भाषणे झाली.

यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विधीज्ञ राहुल मखरे, इंदापूर च्या मावळत्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, आप चे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, सामाजिक जिल्हा कार्याध्यक्ष सागर मिसाळ, इंदापूर शहराध्यक्ष विकास खिलारे, कालिदास देवकर, किसनराव जावळे, छगनराव तांबिले, विजयराव शिंदे, शकील सय्यद, शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे, शहराध्यक्ष महादेव सोमवंशी, अक्षय कोकाटे, आरशद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट: आमदार दत्तात्रय भरणे मामा यांच्या संदर्भात शरद पवार म्हणाले, आम्ही त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले, आमदार, मंत्री केले, त्यांना विविध पातळीवर सहकार्य केले. ते आज लोकांना सांगतात, आम्हाला मतदान करू नका. मोठ्या गंमतीचा हा भाग आहे. आरे मामा, जरा जपून बोल, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही असा सज्जड इशारा भर सभेत शरद पवार यांनी भरणे मामा यांना देताच सभा अवाक झाली तर काहींनी त्याचे टाळ्यांच्या गजरात तर शिट्टी वाजवून स्वागत केले. विशेष म्हणजे शरद पवार यांचा घसा खराब असताना देखील भाषण करून कार्यकर्त्यांना ताकद दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा