इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताची सराटी (ता. इंदापूर) येथे जय्यत तयारी सुरू आहे. येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पालखी सोहळा विसावणार असल्याने भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी उपकेंद्रात औषधे उपलब्ध केली आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगतच्या झाडे, झुडपे तोडली असून परिसरात स्वच्छता मोहीम राबविली आहे.
पुणे जिल्ह्यातील पालखीचा शेवटचा मुक्काम सराटी येथे (ता. ११) होणार आहे. तर शुक्रवार (ता. १२) पादुकांच्या नीरा स्नानानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ होणार आहे. गावातील पालखी मार्गावर अडथळा ठरणाऱ्या झाडे, विद्युत तारा हटवण्यात आलेले आहेत. निर्मलवारी अंतर्गत मोबाईल फिरते शौचालयांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. गावातील सार्वजनिक पाण्याचे स्रोतांच्या ठिकाणी औषध फवारणी, निर्जंतुकीकरण, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू आहे. ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. पालखीतील वारकरी बांधवांच्या मुक्कामी राहण्याची सोय
जिल्हा परिषद शाळा व शाळेच्या प्रांगणात करण्यात आली आहे. पालखी विसाव्याच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून औषध व धूरफवारणी करण्यात आली आहे. गावात व अकलूज इंदापूर मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आले असल्याची माहिती सरपंच अनिशा तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे यांनी दिली. तसेच नीरा नदीमध्ये बंधाऱ्यालगत पादुका स्नानासाठी यावर्षी घाट बांधण्यात आला आहे. तर पुरुष, महिलांच्या शौचालय, अंघोळ व कपडे बदलण्यासाठी सोय स्वतंत्र केल्याचे विस्तार अधिकारी युनूस शेख यांनी दिली.
बावडा पोलिसांतर्फे जेवणाची सोय -
पालखीमार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावतीने वारकऱ्यांना जेवणाची सोय रत्नाई निवासस्थानी करण्यात आली आहे. तर बावडा पोलिस दूरक्षेत्र यांच्या वतीनेही परंपरेप्रमाणे जेवणाची सोय करण्यात आली आहे. अकलूज इंदापूर मार्गावरील वाहतूक गुरुवार व शुक्रवारी फिरवण्यात आली असून ती सरडेवाडी, टेंभुर्णी, संगम, माळीनगर, अकलूज अशी फिरवण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक कोकणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.
फोटो - सराटी येथील पालखी तळावर वारकरी व भाविकांसाठी मोठा शामियाना उभारला गेला आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा