Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा...* *अपंगांना मालमत्ता करात 50 टक्के सवलत!..*

 


*उपसंपादक - नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

पिंपरी :- ‘राज्यात पाच टक्के म्हणजेच ६५ लाख अपंग आहेत. माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाते. त्याप्रमाणे अपंगांनाही मालमत्ता करात ५० टक्के सवलत दिली जाईल. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवावा. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात येईल,' असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले.


महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजित तीनदिवसीय ‘पर्पल जल्लोष’ महोत्सवाचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार अण्णा बनसोडे, अमित गोरखे, उमा खापरे, सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय सचिव राजेश आगरवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे या वेळी उपस्थित होते.


जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत दिलेल्या निधीपैकी ठरावीक निधी अपंगांसाठी खर्च केला जाईल. याबाबतचा आदेश लवकरच काढण्यात येईल, असे सांगून अजित पवार म्हणाले, 'अपंगांमध्ये अफाट आणि असामान्य क्षमता असते. त्यांच्या मेहनत, चिकाटीला योग्य प्रकारचा वाव दिल्यास ते यशाचे शिखर गाठू शकतात. आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागृत करणे, प्रेरणा देण्याचे काम समाजाने केले पाहिजे.


अपंगांना आत्मनिर्भर करण्यासाठी योग्य सुविधा, प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. राज्य सरकारच्या अपंगांसाठीच्या विभागाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र केवळ वायसीएम रुग्णालयात मिळत आहे. पुण्यातील ससून आणि उपजिल्हा रुग्णालयातही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे,' असे पवार यांनी स्पष्ट केले.



अपंग फेरीवाल्यांवर कारवाई करू नका


‘अतिक्रमण कारवाई करत असताना विशेष बाब म्हणून अपंग फेरीवाल्यांवर पुणे, पिंपरी महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासनाने कारवाई करू नये, त्यांच्या उपजीविकेचे साधन काढण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना माेकळी जागा द्यावी. अपंगांनीही शहराला बकालपणा येईल, अशा पद्धतीने कोठेही स्टाॅल उभारू नयेत’, असे आवाहन पवार यांनी केले.


सैफ अली खान हल्ला प्रकरणाची चौकशी सुरू


अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर सापडला आहे. हल्लेखोर घरात कसा गेला, याची चौकशी सुरू आहे. तो चोरीच्या उद्देशाने गेला की त्यांच्या घरातील कोणी यात सहभागी हाेता का, याचा तपास सुरू आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी सरकारचा प्रयत्न असतो असेही पवार म्हणाले. वाल्मीक कराड कुठे लपला होता, तो कुठे होता, याबाबत कोणी काय आरोप केले, याची मला काही माहिती नाही. परंतु, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), विशेष तपास पथक (एसआयटी) या यंत्रणांवर चौकशीची जबाबदारी आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता चौकशी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या माहितीचीही दखल या यंत्रणा घेतील, असेही पवार म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा