Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ जानेवारी, २०२५

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त सदाशिवराव माने विद्यालयात द्वितीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न...*


 

अकलूज (वार्ताहर) - शकूर तांबोळी

माळशिरस तालुक्याच्या उजाड माळरानावर ज्यांनी विकासाचे नंदनवन फुलवले, गोर-गरीब कष्टकरी जनतेसाठी समृद्धीची गंगा आणली असे विकासपुरुष, शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील उर्फ काकासाहेब यांच्या १०७ व्या जयंती निमित्त विद्यालयात द्वितीय पारितोषिक वितरण व तिळगूळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकलूजचे सुप्रसिद्ध रोगनिदानतज्ञ डॉ. संतोष खडतरे यांच्या शुभहस्ते व शि. प्र. मंडळ, अकलूजचे सदस्य रामचंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशाला समितीचे सदस्य आप्पासाहेब मगर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.   



या कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सहकार महर्षींच्या जीवन कार्याची माहिती देताना कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी कठीण परिस्थितीतून व अथक परिश्रमातून आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणक्रांती, धवल क्रांती, औद्योगिकक्रांती घडवून आणली हे सांगितले. सहकारातून समृध्दी निर्माण करणारे व्यक्तिमत्व माळशिरस तालुक्याला लाभले हे माळशिरस तालुक्याचे भाग्यच आहे असे सांगितले. यानंतर सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. महर्षि गीत गायनाने काकासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.  



यानंतर विद्यालयातील द्वितीय पारितोषिकांचे वितरण तसेच संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या १९ व्या  राज्यस्तरीय लेझिम स्पर्धेत मुले व मुली दोन्ही लेझीम संघांनी प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यनिमित्त चषकाचे हस्तांतरण व पारितोषिकांचे आणि खेळाडूंच्या प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या लेझिम संघांसाठी मार्गदर्शक केलेल्या सर्व शिक्षकांना याप्रसंगी गौरवण्यात आले. तसेच विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागाचे सहशिक्षक नानासाहेब वरकड यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे याठिकाणी इंग्रजी विषयातील पी.एचडी मिळविल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.


 

यानंतर शिक्षक मनोगतमध्ये विद्यालयाचे पर्यवेक्षक धनंजय मगर सर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात काकासाहेबांच्या सामाजिक,शैक्षणिक, राजकीय, आर्थिक कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगाच्या आठवणी याठिकाणी सांगितल्या. 



कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संतोष खडतरे यांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन महर्षि काकांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. पुढे बोलताना या शाळेचा मी माजी विद्यार्थी असून माझ्या विद्यार्थी दशेपासून शाळेची शिस्त, गुणवत्ता अद्याप टिकून असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेचे कौतुक करताना येणाऱ्या काळात शाळेचा लौकिक नक्कीच देशपातळीवर पोहचेल असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने ध्येय समोर ठेवून ध्येय प्राप्तीसाठी वाटचाल करावी असा सल्ला दिला.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र गायकवाड यांनी यांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देवून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.  



या कार्यक्रमास रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य जाकीर सय्यद, भारत शिंदे, पर्यवेक्षक उमेश बोरावके, धनंजय मगर, शिक्षक प्रतिनिधी संजय जाधव, प्रमिला राऊत शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन पोपट पवार यांनी तर आभार जाकीर सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता तिळगुळ वाटपाने करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा