*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- राज्यातील महत्वाच्या जिल्हा परिषदांपैकी एक असलेल्या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे. संतोष पाटील यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून गेली काही वर्षे त्यांनी काम केले आहे. त्यांना पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना या अनुभवाचा त्यांना चांगला फायदा होणार आहे
यापूर्वी त्यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. या शिवाय एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून त्यांनी 2008 ते 2011 या कालावधीत काम केले आहे. या काळात त्यांनी चाकण एमआयडीसीतील बरेच प्रश्न मार्गी लावले होते. 2014 ते 2018 या कालावधीत एमआयडीसीच्या मार्केटींग विभागाचे सरव्यवस्थापक म्हणून काम करताना कोरिया, इटली, जपान, सिंगापूर, जर्मनी देशांना भेटी देऊन तेथील गुंतवणूक राज्यात होण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
आळंदीच्या विकास आराखडयाच्या अंमलबजावणीत त्यांची महत्वाची भूमिका होती. खेड एसईझेड मध्येही त्यांनी त्या काळात शेतक-यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळवून दिला. विस्थापितांना घरे मिळवून दिली. ओझर व लेण्याद्री परिसराच्या विकासात तसेच जुन्नरचे प्रभारी नगराध्यक्षपद असतानाही त्यांनी काही कामे मार्गी लावली आहेत. शिवनेरी किल्ल्याच्या विकसना साठीही त्यांनी परिश्रम घेतले होते.
लोकाभिमुख काम करणार....
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना अधिकाधिक लोकाभिमुख काम करण्याचा आपला प्रयत्न असेल. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करुन प्रशासन देखील लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी काम करेल- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा