*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने घ्यावे असे प्रकरण बीड जिल्ह्याचे आहे. सरपंच देशमुख यांच्या खुनाचे शिंतोडे त्यांच्या एका मंत्र्यावर पडूनही ते मंत्री सरकारात आहेत. गडचिरोलीचा नक्षलवाद व अर्बन नक्षलवादाची चिंता करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना बीडचा राजकीय नक्षलवाद अस्वस्थ करीत नाही काय?
परभणीत सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडमधील सरपंच देशमुख या दोन खुनांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. सरपंच देशमुख यांच्या खुनाचा संबंध थेट महाराष्ट्राच्या एका मंत्र्याशी जोडला जातो आहे व धनंजय मुंडे नावाचे ते मंत्री आजही मंत्रिमंडळात सत्ता उपभोगीत आहेत. नैतिकतेच्या कोणत्या संकेतात हे बसते? धनंजय मुंडे यांना चौकशी होईपर्यंत मंत्रिमंडळाबाहेर ठेवले तर महाराष्ट्रावर आभाळ कोसळणार आहे काय? देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दोन महिन्यांत जे कमावले ते सरपंच देशमुख व धनंजय मुंडे प्रकरणात गमावले. फडणवीस म्हणतात, मी या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. याचा अर्थ धनंजय मुंडे यांना वगळून मी सगळ्यांचा बंदोबस्त करीन. श्री. फडणवीस असे का वागतात याचे उत्तर जातीय राजकारणात आहे. मुंडे यांच्यावर कठोर कारवाई केली तर ते ज्या समाजातून येतात तो वंजारी समाज भाजपपासून दुरावला जाईल. त्यामुळे देशमुख हत्येचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर उडाले ते मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व ते करतात व या सगळ्या प्रश्नावर अजित पवार मूग गिळून बसले आहेत. कायद्याचे बडगे व चौकश्यांचे ससेमिरे फक्त सामान्य माणसे आणि भाजपच्या राजकीय विरोधकांसाठी. बाकी सगळ्यांना खून, हत्या, खंडणीच्या गुन्ह्यातही माफी आहे. हा कसला कायदा! हे कसले राज्य!
संशयास्पद मृत्यू
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही आणि बीडमध्ये ते गेल्या 30-35 वर्षांपासून पूर्णपणे संपले. त्यास आतापर्यंतचे सर्वच राज्यकर्ते जबाबदार आहेत. गेल्या दहा वर्षांत परळी, बीडमधील अनेक संशयास्पद मृत्यू व खुनांची जंत्री आता दिली जाते, पण या रहस्यमय खून सत्राची सुरुवात 1 डिसेंबर 1980 पासून झाली. दोनवेळा आमदार राहिलेले रघुनाथ मुंडे यांचा रहस्यमय अपघात घडवून त्यांना ठार केले गेले. खोटी नेमप्लेट लावलेल्या वाहनाने त्यांना रस्त्यावर ठोकर मारली व मारेकरी पसार झाले. रघुनाथ मुंडे हे तेव्हा कुणाच्या तरी राजकीय वाटेतले अडसर ठरत होते व त्यांना अशा पद्धतीने मारून रस्ता मोकळा केला असे तेव्हा बीडच्या राजकारणाची नस जाणणारे दबक्या आवाजात बोलत होते. बिहार, उत्तर प्रदेश आणि मुंबईतच केवळ माफिया नाहीत, तर ते बीडमध्येही आहेत याची ग्वाही देणारे खुनाचे पुरावे रोज समोर येत आहेत. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही खुलासा करणार आहेत काय? धनंजय मुंडे हे परळीत दहशतवादाच्या जोरावर निवडून आले. तसे सबळ पुरावे आहेत. निवडणूक आयोगाने सत्य मानले तर मुंडे यांची निवडणूक रद्द होऊ शकेल, पण हे सर्व करायचे कोणी? नैतिकता हा विषयच आता निकालात निघाला. धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी मोठे केले. तेच मुंडे अजित पवारांच्या गोटात गेले व शरद पवारांचा पक्ष फोडणारे प्रमुख शिलेदार ठरले. या एका महान कार्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांचे गुन्हे पोटात घालीत आहेत काय? धनंजय मुंडे यांनी स्वत:चे काका गोपीनाथ मुंडे यांनाही दगा दिला. पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध सर्व पुराव्यांची फाईल घेऊन ते अंजली दमानिया यांना भेटले. आता भाऊ-बहीण एक झाले व ज्यांनी आधार दिला त्या शरद पवारांनाच सोडले. उद्या ते अजित पवार यांनाही सोडतील. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आज कोणीच कोणाचे राहिलेले नाही. खरे पक्ष उरले नाहीत, त्यामुळे विचारधारा नाही. सर्व युक्त्या, भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून निवडून येणारे व निवडून आणणारे असेच लोक राजकारणात यापुढे टिकतील आणि त्यांना भ्रष्टाचार, खंडणी, खुनासारखे गुन्हे माफ आहेत! ही सध्याच्या भाजपची नियत आहे.
मुलींचे अपहरण
परभणीत संविधानाचे रक्षण करू पाहणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाची पोलीस कोठडीत हत्या झाली. सोमनाथ पोलीस मारहाणीत मरण पावला, पण महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस ते मानायला तयार नाहीत. सोमनाथच्या घरी सरकारी अधिकारी 10 लाखांचा चेक घेऊन गेले. सोमनाथच्या कुटुंबाने तो चेक नाकारला. दिवसाढवळ्या लोकांना मारायचे व आाक्रोश वाढला की, सरकारी तिजोरीतून पाच-दहा लाखांचा चेक नुकसानभरपाई म्हणून पाठवायचा. जे एकनाथ शिंदे करत होते तेच देवेंद्र फडणवीस करत असतील तर राज्यात बदलले काय? धनंजय मुंडे व वाल्मीक कराड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुंडे यांचा बीडचा कारभारी कराड हे उघड आहे. तोच वाल्मीक कराड व त्याची टोळी संपूर्ण बीड जिल्ह्यात माफिया राज चालवते. पोलीस, प्रशासन व न्यायालय त्यांचे आदेश ऐकते. धनंजय मुंडे हे पालकमंत्री, पण मुंडे यांनी पालकमंत्रीपद वाल्मीक कराड याला चालवायला दिले होते, असा सरळ आरोप भाजपचेच एक आमदार सुरेश धस करतात. तेव्हा बीडमध्ये काय घडत होते याची कल्पना येते. बीडमध्ये लोकांना जगणे, व्यापार, उद्योग करणे कठीण झाले. नजरेत भरलेल्या मुलींना सरळ घरातून व रस्त्यावरून उचलून न्यायचे व आई-बापांनी 'ब्र' काढला तर त्यांना मारायचे. विवाहित महिलांना घरातून उचलून नेले जात होते. जणू एकदम हिंदी सिनेमा. परळी, केज, बीड, माजलगावचे पोलीस या माफियांचे जणू पगारी नोकरच बनले. धनंजय मुंडे यांचा उजवा हात वाल्मीक कराड याचे रोजचे 'कलेक्शन' एक ते दीड कोटी रुपये. हे सर्व पैसे नक्की कोणापर्यंत पोहोचत होते हे मुख्यमंत्री फडणवीस सांगू शकतील काय? भारतीय लोकशाही आणि सभ्यतेची धूळधाण उडवणारे हे राजकारण महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात घडत आहे. मते विकत घ्यायची, मतदारांना मते टाकू द्यायची नाहीत. खंडणीच्या पैशांवर तरारलेले हे राजकारण महाराष्ट्राला कोठे घेऊन चालले आहे?
परळीतला रक्तपात
सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत निर्घृण पद्धतीने भररस्त्यावर ठार केले. त्यांना भररस्त्यावर किती निर्घृणपणे मारले हे सांगताना आमदार संदीप क्षीरसागर यांना विधानसभेत रडू अनावर झाले. देशमुखांची हत्या म्हणजे निर्घृणतेचा कळस आहे. मरताना देशमुखांनी पाणी मागितले तर त्यांच्या तोंडात मारेकऱ्यांनी लघवी केली. महाराष्ट्राच्या मातीत ही विकृती कोणी निर्माण केली व ही विकृती आज कोण पोसत आहेत? याचा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस आता तरी करणार आहेत काय? एकट्या परळी तालुक्यात मागच्या वर्षभरात 109 मृतदेह सापडले व त्या सगळ्या हत्या असतील तर हे खून कोणी केले व या काळात बीडचे पोलीस कोणाची चाकरी करीत होते? गडचिरोलीचा नक्षलवाद मुख्यमंत्री फडणवीस यांना संपवायचा आहे. अर्बन नक्षलवादावर ते बोलतात, पण बीड जिल्ह्यातला राजकीय नक्षलवाद ते पोसतात ही विसंगती आहे.
वंजारी समाजाचे मरण
आता धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे मोठे नेते आहेत. मुंडे यांच्यावर कारवाई केली तर 'ओबीसी'मधील वंजारी समाज नाराज होईल असे भाजप व अजित पवारांना वाटते, पण बीड जिल्ह्यातले जे खून सत्र सुरू आहे, त्यातील बहुसंख्य खून हे वंजारी समाजाच्या लोकांचेच झाले व ते याच टोळीने घडवले हे स्पष्ट आहे. आता संतोष देशमुख यांच्या खुनाने मागच्या सर्व खुनांना वाचा फुटली. मुंडे-वाल्मीक कराड एक आहेत. कराड हा मुंडे यांचा व्यावसायिक म्हणजे लुटीतला मोठा भागीदार आहे.
कराड, फडणवीस, अजित पवार हे त्रिकुटही वेगळे नाही. जितेंद्र आव्हाड हे स्वत: वंजारी, पण आव्हाड यांनी बीडमधील मुंडे-कराड यांच्या कारनाम्यांवर सगळ्यात जास्त हल्ले केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यासुद्धा आता मैदानात आल्या, पण या सगळ्याचा परिणाम होईल काय? भाजप हा सर्व भ्रष्टाचारी व गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे व बीड जिल्हा या अड्डय़ाची मुख्य शाखा झाली. देवेंद्र फडणवीस हे कमजोर लोकांना दाबतात व 'बीड क्लिंटन'पुढे नमते घेतात. त्यामुळे अनेक निरपराध 'वंजारी' प्राणास मुकले त्याचे काय?
संतोष देशमुख यांचा खूनही पचवायचे सुरू आहे.
महाराष्ट्रातील संस्कृतीचे थडगे बीडमध्ये उभे राहिले आहे. मशिदींचे खोदकाम करण्यापेक्षा बीडचे हे थडगे आधी पाडा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा