*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
श्रीक्षेत्र तुळजापुरातील श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानकडून राज्य संरक्षित स्मारकाचा विकास आराखड्याबाबत देण्यात आलेल्या लेखी सुचनांचा विचार न करता विकास आराखडा राबवित असल्याबाबत. चे लेखी निवेदन तुळजापूर तालुका व शहर महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांना देण्यात आले असून याबाबत सविस्तर मागणी अशी कि
प्रतिवर्षी श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शन व कुलधर्म कुलाचार करणाऱ्या देविभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.त्यामुळे मंदिर प्रशासन,पोलीस प्रशासन,नगर परिषद यांच्यावरती नियोजनाचा अतिरेक भार पडत आहे.या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने श्री तुळजा भवानी मंदिर व परिसराचा विकास करून जास्तीतजास्त देविभक्तांना सेवासुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा मंजूर केला.श्री तुळजा भवानी मातेचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपिठांपैकी एक मुख्य शक्तीपीठ असून आध्यात्मिक,ऐतिहासिक,व पौराणिक महत्व असणारे तिर्थक्षेत्र आहे. श्री तुळजा भवानी मंदिराच्या वास्तूचे प्रमाण हे १२ व्या शतकातील हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राने निर्माण झालेले पुरातन वास्तू आहे. श्री तुळजा भवानी मंदिरचे संरक्षण, संवर्धन करूनच येथे येणा-या सर्व भक्तांच्या आस्था,श्रद्धा व भक्ती विचारात घ्यावेत. श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानने पुढील १००ते २०० वर्षाचा विचार करून भाविकांना जास्तीत जास्त पायाभूत सोयीसुविधा,सुलभपणे देवि दर्शन तसेच कुलधर्म कुलाचार व्यवस्थितपणे पार पाडण्याकरीता दि.२६/०१/२०२२ रोजी ठराव क्र.०५ नुसार महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाच्या पुर्वपरवानगीने विकास आराखडा (DPR) तयार करण्याचे काम हाती घेतले होते.त्यानंतर समस्त गावकरी,पुजारी व व्यापारी वर्गांचा विरोध झाल्याने मंदिर संस्थानने त्यात बदल करून दुसरा विकास आराखडा (Plan B)तयार केलेला आहे.याबाबत दि.१५/०७/२०२४ ते २३/०७/२०२४ पर्यंत काही सुचना व तक्रारी असतील तर लेखी स्वरूपात मंदिर कार्यालयात सादर करण्याचे जाहीर प्रकटनानुसार कळविले होते. तरी खालील सर्व विषयांचा गांभीर्यपूर्वक विचार केला जावा ही विनंती
१) श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य स्थान ज्यास सिंहासन असे संबोधतात याची वास्तू स्थापत्य शास्त्रानुसार धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टीने योग्य त्या रचनेत आहे त्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल करू नये.
२) श्री तुळजा भवानी मातेचा मुख्य गाभारा आध्यात्मिक स्थापत्य शास्त्रानुसार अगदी योग्य असून या गाभाऱ्यात कसलाही बदल करू नये तसेच मुख्य गाभाऱ्याचे द्वार आहे त्या स्थितीतच जतन व संवर्धन करावे.
३) आराधवाडी परिसरात राबविला जाणारा विकास आराखडा रद्द करून तुळजापूर शहराच्या चारी बाजुने विकास आराखडा राबविला जावा.
४) श्री तुळजा भवानी मंदिरातील सिंह गाभाऱ्याचा दरवाजा मोठा केल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वापार आहे तसे चांदीचे द्वार व चांदीचा उंबरठा बसवून गाभाऱ्याचे पावित्र्य राखावे.
५) श्री तुळजा भवानी मातेच्या शेजगृहात कसलाही बदल न करता त्याचे पावित्र्य जतन करावे.
६) श्री तुळजा भवानी मातेच्या कुलधर्म कुलाचार करण्यासाठी आलेल्या भक्तांच्या अनेक पूजा विधी बंद केलेल्या आहेत त्या पूर्वापार मंदिर परिसरातच चालू करून द्यावेत.
७) श्री तुळजा भवानी मंदिरात सर्व भाविक भक्तांना प्रवेश राजे शहाजी महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वारातूनच दिला जावा, जेणेकरून मुख्य मंदिरात प्रवेश करण्याअगोदर सर्व भाविक भक्तांना श्री कल्लोळ तीर्थ कुंड,श्री गोमुख तीर्थ कुंड येथे हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रथम स्वतःची शुद्धी करून श्री सिद्धिविनायकाचे प्रथम दर्शन करूनच आई तुळजा भवानी मातेचे दर्शन घेता यावे.
८) दर्शन मंडप हा घाटशिळ रोड कार पार्कींगच्या स्थानावरतीच केला जावा जेणेकरून देविभक्तांना तो सुलभ होईल.
९) श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी व कुलधर्म कुलाचार करण्यासाठी अनेक वृद्ध व अपंग भाविक भक्त मंदिरात येतात. या भक्तांची मंदिर संस्थानच्या वतीने मुखदर्शनाची विशेष सोय केली जावी.
१०) तुळजापूर शहरामध्ये अनेक पुरातन तीर्थ कुंड असून यांच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. तरी तुळजापूर शहरातील सर्व तीर्थ कुंडांचा जीर्णोद्धार केला जावा व त्याचा लाभ देविभक्तांना घेता यावा.
११) आई तुळजा भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेली भव्य मुर्ती बसविली जाणार आहे ती रद्द करून त्याऐवजी शहरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय, सुलभ शौचालय,कचरा कुंड्याची सोय केली जावी.
१२) रामदरा तलाव ऐवजी पाचुंदा तलाव किंवा पापनास तलाव वरती ५१ शक्तीपिठे बांधून भव्य कारंजे सह बगीचा विकसित करावा.
१३) रामदरा तलाव ऐवजी पाचुंदा तलावात बोटिंगची सोय केली जावी.जेणेकरून देवि भक्तांना गैरसोय होणार नाही.
१४) पापणास तिर्थ कुंड शेजारी असलेले वस्तुसंग्रहालय व नाना नानी पार्क विकसित करावे.
१५) पुर्वी कै.उद्धवराव पाटिल सभागृह होते तेथेच नव्याने नाट्य सभागृह व्हावे.
१६) देवि भक्तांना शहर व परिसरातील उपदेवता, पर्यटन स्थळांचे दर्शन घेण्याकरीता मोफत बसची सोय केली जावी.
तरी आपणास विनंती आहे की श्री तुळजा भवानी मंदिर व तुळजापूर शहराचा विकास व्हावा यासाठी आम्ही आग्रही आहोत,परंतु श्री तुळजा भवानी मंदिर मधील आध्यात्मिक स्थापत्य शास्त्रीय,पवित्र व पुरातन स्थापत्य यांचे संवर्धन व जतन व्हावे तसेच पावित्र्य राखले जावे. यात काळानुसार व वाढती देविभक्तांची संख्यानुसार कुठे दुरूस्तीची आवश्यकता वाटली तर ती केली जावी. तसेच वरील बाबीचा आपण विचार न केल्यास महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल व वेळ प्रसंगी मे. न्यायालयात न्याय मागितला जाईल व होणाऱ्या परिणामास आपण स्वत: जबाबदार असाल असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा