*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, आता भाविकांना मंदिरात प्रवेश करताना पर्स व बॅग नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, गेले तीन दिवस दोन्ही बाजूंनी हवाई हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानकडून कुरघोड्या अद्याप थांबलेल्या नाहीत, तर भारताकडूनही त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जात आहे. या तणावपूर्ण वातावरणामुळे देशभरात सतर्कतेचा इशारा (अलर्ट) जारी करण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख शहरांबरोबरच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवरही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात येत असतात. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्यामुळे भाविकांची संख्या अधिक वाढली आहे. त्यातच सध्याची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच गेटवरच भाविकांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता बॅग आणि महिलांच्या पर्स घेऊन मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात सूचना देणारे फलक (बॅनर) लावले आहेत. त्यामुळे आता भाविकांना आपले सामान बाहेर ठेवूनच मंदिरात दर्शनासाठी जावे लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा