Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ मे, २०२५

*शस्त्रविराम सहमती नंतर काँग्रेसने का केले? इंदिरा गांधीं यांचे फोटो पोस्ट!..*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

भारत-पाकिस्तान मधील तणाव काल रविवारपासून काहीसा शमल्याचे चित्र दिसत आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अनेक महत्त्वाच्या निर्णयांनंतर भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केला. त्यानंतर अनेकदा पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. यामध्ये जम्मू-काश्मीर तसंच जवळील भागातील काही नागरिकांनाही जीव गमवावा लागला. अखेर शनिवारी दोन्ही देशांनी शस्त्रविरामावर सहमती दर्शविल्यानंतर हा संघर्ष थांबणार अशी चिन्हं असतानाच पाककडून पुन्हा गोळीबार करण्यात आला. या परिस्थितीत केंद्र सरकारला विरोधकांकडून पाठिंबा मिळत असला तरीही काही थेट प्रश्नही विचारले जात आहेत.

पहलगाम हल्ला झाल्यानंतर तसंच ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहितीसाठी विरोधी नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते. या पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी त्यांनी केली होती. भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविराम सहमतीच्या घोषणेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद आयोजित करत त्याबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेच्या एका तासाच्या आत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील १९७१ च्या युद्धाबाबतच्या पोस्ट दिसू लागल्या.

इंदिरा गांधींचे फोटो आणि पोस्ट

इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता, अशा पोस्ट काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केल्या. १९७१ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली. सध्या सुरू असलेल्या संघर्षावरून त्यावेळच्या इंदिरा गांधींच्या कणखर भूमिकेची आठवण होत असल्याचेही पोस्टमधून म्हणण्यात आले. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करत 'इंदिरा होना आसान नहीं', असं म्हटलं आहे.

इंदिरा गांधी होना आसान नहीं pic.twitter.com/lerjJq8w5U

— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 10, 2025

१९७१ मध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानला चिरडून टाकले होते. तेव्हा त्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि शेवटपर्यंत नेला होता. त्यापेक्षा सध्याचा करार हा बिनबुडाचा होता असा मुद्दा या पोस्टमधून काँग्रेसने मांडला.

ऑपरेशन सिंदूर सुरू होईपर्यंत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष शांत होते आणि सरकारलाही त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. सशस्त्र दलांचे कौतुक करत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्यापर्यंत भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये कोणताही वाद निर्माण झाला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या या लढाईत सर्वजण एकत्रित आहेत हा संदेश जाणं महत्त्वाचं होतं. असं असताना शस्त्रविराम घोषित झाल्यानंतरही काही क्षणांतच त्याचं उल्लंघन पाकिस्तानने केलं.

काँग्रेस प्रामुख्याने दोन कारणांवरून या शस्त्रविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. एक म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा का केली आणि दोन देशांव्यतिरिक्त तिसऱ्या कोणीतरी यामध्ये मध्यस्थी का केली. दुसरं कारण म्हणजे, पाकिस्तानबाबत पूर्वीचा अनुभव आणि त्यांचा इतिहास पाहता शेवटपर्यंत लढाई का लढली गेली नाही.

भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविरामाबाबत भारत कमकुवत असल्याचे दिसते असा मुद्दा काँग्रेसने मांडला आहे. काँग्रेसने १९७१ च्या युद्धानंतर इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानबरोबर केलेल्या युद्धबंदी करारावर स्वाक्षरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. त्यानंतर भाजपाने त्यांना लगेचच उत्तर दिले. १९७१ मधील परिस्थिती २०२५ पेक्षा वेगळी असल्याचे भाजपाने निदर्शनास आणून दिले. नेहरू सिद्धांत आणि काँग्रेसच्या धोरणांना कारणीभूत ठरवत भाजपाने कायमच पाकिस्तानच्या कृत्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

पाकिस्तानच्या कुरापतींनंतर काल भारत सरकारने असेही म्हटले आहे की, 'पुढील दहशतवादी कृत्य युद्ध म्हणून पाहिले जाईल.'

यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे शशी थरूर यांनी भाजपाच्याच शब्दप्रयोगाला अनुसरून स्वत:च्या पक्षाला नेहमीप्रमाणे तोंडावर पाडलं आहे. १९७१चे युद्ध हे एक यश होते, मात्र २०२५ पेक्षा ते खूप वेगळे होते, यावर थरूर यांनी प्रकाश टाकला आहे. केवळ थरूर यांनीच नाही तर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही भारत सरकारचे कौतुक केले. पाकिस्तानला दिलेल्या कठोर आणि आक्रमक प्रत्युत्तराबाबत त्यांनी सरकारला पाठिंबा दर्शविला आहे. हल्ला झाल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरअंतर्गत काही कारवायांनंतर विरोधी पक्ष विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी करत आहेत. राहुल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांनीही हीच मागणी केली आहे.

बालाकोट हल्ल्याच्या अगदी विरुद्ध प्रतिक्रिया काँग्रेसने यावेळी ऑपरेशन सिंदूरनंतर दिली आहे. काँग्रेसला पंतप्रधान, सरकार आणि अर्थातच सशस्त्र दलांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे एक कारण आहे. अर्थात, याला एक पार्श्वभूमीदेखील आहे. पुलवामा हल्ला आणि बालाकोट हवाई हल्ल्यानंतर काँग्रेसकडून मिळालेला प्रतिसाद वेगळा आणि त्यामुळे त्यांना निवडणूकदृष्ट्याही नुकसान झाले होते. हल्ल्यांमुळे काही साध्य झाले आहे का, असा प्रश्न विचारत तात्काळ पुरावे मागितल्यानंतर काँग्रेसला हे कळून चुकले की राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चुकीच्या बाजूने उभे राहिल्याने त्यांना भविष्यात त्रास होईल.

खरं तर लोकसभेच्या निकालानंतर पक्षांतर्गत काही पत्रकं प्रसारित करण्यात आली होती, ज्यामधून वरिष्ठ नेतृत्वाला सांगण्यात आले की, हल्ल्यांवर प्रश्न विचारल्याने पक्षाला खूप नुकसान झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा