Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १८ मे, २०२५

*विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मागे दडलय काय......?*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

बीड येथील एका प्रख्यात डॉक्टरच्या 720 पैकी 710 गुण मिळवून भोपाळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या नामांकित वैद्यकीय शिक्षण संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलाने स्वतःच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून नुकतीच आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची अत्यंत धक्कादायक बातमी वाचली. सदर मुलगा अत्यंत बुद्धिमान होता , घरची आर्थिक संपन्नता असल्याने कोणतेही अडचण नव्हती. कोणत्याही गोष्टीची कमी नस्ताना आत्महत्या का करावी वाटली ? याचे कारण शिक्षण तज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी व मानसोपचार तज्ञांनी शोधणे गरजेचे वाटते. 

          मी शिक्षण क्षेत्रात गेली 45 वर्षापेक्षा जास्त काळ प्राध्यापक, प्राचार्य, शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करत आहे‌‌. त्यामुळे या विषयासंबंधी माझे मत या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

दरवर्षी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आलेली 18 ते 24 वर्ष वयोगटातील अनेक अत्यंत बुद्धिमान व हुशार मुले आत्महत्या करताना दिसतात. यामागे अनेक कारणे असू शकतात उदाहरणार्थ पालकांच्या अवास्तव व अवाजवी अपेक्षा, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी लक्षात न घेता त्याच्या जबरदस्तीने त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला न आवडणाऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश देणे, आपल्या इच्छा व अपेक्षा त्याच्यावर जबरदस्तीने लादणे, अभ्यासाचा ताण, मानसिक ताणतणाव, कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक अडचणी, प्रेमप्रकरणे, रॅगिंग, भांडणे, अपयश, अपमान, एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध होणे इत्यादी बाबींचा समावेश करता येईल. 

          पूर्वी शालेय अभ्यासक्रमात मूल्य शिक्षणाचा भाग म्हणून रामायण, महाभारत, इसापनीतीच्या कथा, अकबर बिरबलाच्या कथा इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमते बरोबरच वैचारिक क्षमता व मानसिक क्षमता व अध्यात्मिक शक्ती विकसित करून ती अधिक बळकट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असे. त्यामुळे कितीही संकट आले ,कितीही अडचणी, अपयश आले तरी तरी अशा संकटाला ,अडचणीला किंवा अपयशाला न घाबरता, न डगमगता विद्यार्थी सामोरे जात असत व त्यातून आपला मार्ग स्वतःच काढत असत. परंतु प्रचलित शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रमातून हा भाग काढून टाकल्यामुळे केवळ स्मरणशक्ती व बौद्धिक क्षमता विकसित होते जी फक्त त्याला मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे मोजली जाते. गुणांच्या टक्केवारी बरोबरच त्याचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास झाला की नाही ? हे तपासण्याचे कोणतेही साधन प्रचलित परीक्षा व मूल्यपन पद्धती मध्ये दिसत नाही.

      बोर्डाचा परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक घरांमध्ये असे चित्र दिसते की मुलाला 97% 98% मार्क्स मिळाले आहेत परंतु एक टक्का किंवा अर्धा टक्का कमी का पडला यामुळे घरामध्ये रडारडा व स्मशान शांतता आहे, तर काही घरांमध्ये आपला मुलगा पास होणार की नाही या चिंतेत असलेले पालक त्यांच्या मुलाने 35 टक्के 40 टक्के गुण घेऊन पास झाला याचा आनंद ते पेढे वाटून व्यक्त करताना दिसतात. ''बरं झालं पास झाला, आम्हाला वाटलं वर्ष वाया जाते की काय ?'' ही भावना त्यांच्या मध्ये दिसून येते. 

          आयआयटी, वैद्यकीय महाविद्यालय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही की सर्व संपले अशी भावना आज विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात दृढ झाली आहे. यापेक्षाही अधिक संधी उद्योगधंदे, व्यवसाय, एमपीएससी, यूपीएससीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सिव्हिल सर्विसेस, कृषी तसेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यासारख्या मिलिटरी सर्विसेस, संशोधन ,इंडस्ट्री, व्यवस्थापन, ऑडिट अँड अकाउंटिंग, बँकिंग, रेल्वे इत्यादी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात सेवेच्या चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत हे जवळ जवळआपण विसरलोच आहोत. त्यामुळे प्रशासकीय सेवेत आज उत्तर प्रदेश, बिहार ,दिल्ली ,हरियाणा इत्यादी राज्यातून फार मोठ्या प्रमाणात तरुण मुले भरती होताना दिसतात. आपण मात्र एखादा सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष,आमदार , खासदार किंवा मंत्र्याच्या ओळखीने एखाद्या साखर कारखाना, सूतगिरणी, पंचायत समिती, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मध्ये कसली तरी नोकरी मिळते का यासाठी प्रयत्न करत असतो.बदलत्या काळाच्या गरजा ओळखून तरुणांनी नवनवीन वाटा शोधणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही.

न्यूक्लिअर कुटुंब पद्धतीमुळे घरामध्ये मोजकीच माणसे असतात ,आजी- आजोबा, काका- काकी ,बहिण-भाऊ, आत्या- मावशी घरात दिसत नाहीत, त्यामुळे बालवयात मुलावर योग्य ते संस्कार होत नाहीत, अनेक जोडप्यांना एक किंवा दोनच मुले असतात. त्यामुळे अवास्तव लाड केले जातात ,जे मागील ते त्याला दिले जाते, त्याचे सर्व हट्ट पुरवले जातात, त्याला कोणतीही अडचण येऊ देत नाहीत, त्यामुळे अशी मुले हट्टी बनतात ,प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एखादी जरी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली नाही की हे मुले आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलतात.

        घरामध्ये सुसंवाद राहिला पाहिजे, मुलाशी सातत्याने बोलले पाहिजे ,त्याची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे ,त्याच्यामध्ये काही बदल झाल्यास तो का झाला याचा शोध मानसशास्त्रज्ञ अथवा मानसोपचार तज्ञ यांच्या मदतीने वेळोवेळी घेतला पाहिजे, तरच ही मुले जीवनामध्ये यशस्वी होतील.

आज गुणवत्ते ऐवजी गुणाधिष्ठित शिक्षण झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचा शिक्षण तज्ञांनी विचार करणे गरजेचे आहे व त्यानुसार अभ्यासक्रमात आवश्यकते बदल करणे गरजेचे वाटते. धन्यवाद.

              आपला ,

*प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख*

  माजी प्राचार्य 

शंकरराव मोहिते महाविद्यालय ,

अकलूज जिल्हा सोलापूर

अध्यक्ष ,

महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ ,पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा