उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
पुणे : नुकतेच दिल्ली येथे पार पडलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर, पुढील ९९व्या संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. अखेर, साताऱ्याला हा मान प्राप्त झाला असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहुपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित केले जाणार आहे.
महामंडळाच्या बैठकीत निर्णय
पुण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी तसेच विविध घटक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
९९व्या संमेलनासाठी स्थळनिवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने राज्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन प्राप्त झालेल्या निमंत्रणांचा अभ्यास केला. त्या पाहण्यांनंतर समितीने साताऱ्याची निवड करत अहवाल सादर केला, त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
साताऱ्यात ३२ वर्षांनंतर म्हणजेच १९९३ नंतर पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्या वेळी सुप्रसिद्ध साहित्यिक विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. साताऱ्याचे हे चौथे संमेलन असणार आहे. यापूर्वी पहिले आणि तिसरे संमेलन रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली येथेच भरवण्यात आले होते.
शाहुपुरी शाखेने गेली १२ वर्षे साताऱ्याला संमेलन मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मराठी साहित्य क्षेत्रासाठी ही एक आनंदाची आणि गौरवाची बातमी ठरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा