Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १० जुलै, २०२५

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'अचानक' अधिवेशन सोडून दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार ?...चर्चेला उधाण..!*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मुंबई- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीत गेल्याची माहिती आहे. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असून अधिवेशन सोडून ते दिल्ली दौऱ्यावर गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांचे अधिवेशनाच्या व्यक्तिरिक्त इतरही नियोजित कार्यक्रम होते. मात्र हे कार्यक्रमा सोडून ते दिल्लीला निघून गेले आहेत. नियोजित कार्यक्रमात त्यांनी मंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांना जाण्याच्या सूचना केल्याचे समजते. त्यांच्या दिल्लीवारीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण या दौऱ्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. शिंदेंच्या या दौऱ्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या निर्विवाद बहुमतानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. मागील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतरही आपल्याला पुन्हा राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर त्यांचा विविध निर्णयांवरून भाजपशी संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातून ते नाराज असल्याची चर्चा वारंवार रंगत आहे.



दुसरीकडे, राज्यात नुकत्याच निर्माण झालेल्या मराठी-हिंदी वादामुळेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची कोंडी झाली असून मराठी मतदारांना गमावण्याची भीती त्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय कोंडीमुळेच एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अचानक भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या भेटीबाबत अधिकृतरीत्या कसलीही माहिती देण्यात आली नसून पुढील काही दिवसांत या दिल्ली दौऱ्याबद्दल एकनाथ शिंदेंकडून काय खुलासा केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा