Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १५ जुलै, २०२५

इंदापूर तालुक्यातील १२० होमिओपॅथिक डॉक्टर्स मुंबई येथे आंदोलनात १६ जुलै पासून सहभागी होणार

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर -8378081147

-----सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंद करावी, आयुष होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न तातडीने सोडवावेत तसेच जिल्हा व तालुका स्तरावर होमिओपॅथिक हॉस्पिटल सुरू करून होमिओपॅथिक डॉक्टरांना त्यामध्ये सामावून सामावून घ्यावे आदी प्रमुख मागण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात इंदापूर तालुक्यातील १२० डॉक्टर्स सहभागी होणार असल्याची माहिती इंदापूर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा व विद्यमान अध्यक्ष डॉ. सूर्यकांत बनसुडे यांनी दिली.

इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शहा, विद्यमान अध्यक्ष डॉ. सूर्यकांत बनसुडे, डॉ. सुचेता जहागिरदार, डॉ. राधिका शहा यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन इंदापूर तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा मुंबई येथील आझाद मैदानावर करत असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यात आला.

निवेदन देताना

अविनाश डोईफोडे, राहुल पारेकर, डॉ. अरविंद अरकिले, डॉ. आशिष दोभाडा, डॉ. रियाज पठाण, डॉ. सचिन बाबर, डॉ. मधुकर राऊत, डॉ. निलेश कुंभार, डॉ. सतीश शिंगाडे, डॉ. जुबेर मोमीन, डॉ. आमिर मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. संदेश शहा म्हणाले, राज्यात होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीचे ९० हजारहून जास्त डॉक्टर्स असून ते राज्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात वैद्यकीय सेवा देत आहेत. कोरोना महामारीत देखील त्यांनी स्वजीवाची पर्वा न करता अनमोल योगदान दिले आहे. शासनाने देखील ते मान्य केले आहे. मात्र शासन होमिओपॅथिक डॉक्टरांना वाऱ्यावर सोडू पहात आहे.




सर्वांसाठी आरोग्य अभियान सन २००० यशस्वी न झाल्याने शासनाने प्रभावी आरोग्यसेवा देण्यासाठी मार्च २०१४ मध्ये विधिमंडळ अधिनियम पारित करत त्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना सामावून घेतले. राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांना शासनमान्य एक वर्षाचा आधुनिक चिकित्सा पद्धतीच्या औषधशास्त्र अभ्यासक्रम शिकण्यास शासकीय व खासगी आधुनिक चिकित्सा पद्धतीच्या महाविद्यालयात परवानगी देण्यात आली. सन २०१७ मध्ये पहिली डॉक्टरांची तुकडी बाहेर पडली. आज अखेर दहा हजार डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेत दिनांक १५ जुलै पासून नोंदणी करण्याचा आदेश शासनाने केला. मात्र त्यास इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशने विरोध केल्या मुळे शासनाने ही नोंदणी रद्द करून एक समिती निर्माण केली. या सात जणांच्या समितीत ५ डॉक्टर्स आधुनिक चिकित्सा पद्धतीचे तर एक डॉक्टर होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीचा आहे. त्यामुळे बहुमतावर समितीचा निर्णय काय होणार हे उघड गुपीत आहे. त्यामुळे शासनाने होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक १६ जुलै पासून तीव्र आंदोलन करत आहोत. या आंदोलनाची सर्व जबाबदारी शासनाची राहील.

सूत्रसंचालन डॉ. निलेश कुंभार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा