*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
करमाळा : ऑनलाइन रमी गेमच्या नादात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील २६ वर्षीय जय जाधव याचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. रमीच्या व्यसनामुळे जयवर ८० लाखांचे कर्ज झाले असून, त्याने दीड एकर शेतजमीन, स्कॉर्पिओ गाडी, रिअल इस्टेटमधील २३ लाख आणि मित्रांकडून घेतलेले २० लाख रुपये गमावले आहेत. या गेमच्या आहारी गेलेल्या तरुणांना जयने आवाहन केले आहे, "मंत्र्यांचा व्हिडीओ पाहून चुकीची प्रेरणा घेऊ नका, रमीमुळे झालेलं नुकसान पुरे, आता थांबा!"
महाराष्ट्रात ऑनलाइन रमी, पोकर आणि क्रिकेट बेटिंगचे व्यसन झपाट्याने वाढत आहे. पुणे, ठाणे, औरंगाबादपासून ग्रामीण भागातील तरुणही याच्या विळख्यात अडकत आहेत. गेल्या दोन वर्षांत कर्जबाजारीपणा, कौटुंबिक कलह आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर, विधानसभेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. या घटनेने मंत्र्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, ऑनलाइन गेमला अप्रत्यक्ष मान्यता मिळत असल्याचा आरोप होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन गेमिंगमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत चिंता व्यक्त करत केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एका घटनेचा उल्लेख केला, जिथे एका व्यक्तीने गेमिंगच्या नादात जमीन, घर गमावले आणि कर्जामुळे कुटुंबासह आत्महत्या केली.
राज्य सरकारने ऑनलाइन गेमिंगसाठी कठोर नियमावली, जनजागृती मोहिमा आणि मानसिक आरोग्य केंद्रे स्थापन करणे गरजेचे आहे. तसेच, सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणीही जोर धरत आहे. ऑनलाइन रमीच्या या क्लिकबेटमुळे तरुणांचे आयुष्य धोक्यात येत असल्याने तातडीने उपाययोजना आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा