Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ जुलै, २०२५

*महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे बस स्थानक---अनेकांच्या असंख्य आठवणींचा केंद्रबिंदू---- ऍड.शीतल शामराव चव्हाण*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मागच्या आठवड्यात उमरगा बस स्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ तथा भूमीपूजनाचा कार्यक्रम धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते व उमरगा - लोहारा भागातील इतर काही नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला. या बस स्थानकाचे काम, भूमीपूजनाचा कार्यक्रम, इतर राजकारण याबद्दल आलाहीदा नंतर लिहिता येईल. पण या कार्यक्रमाच्या बातम्या पाहून या बस स्थानकाशी निगडीत अनेक आठवणी जाग्या झाल्या. या निमित्ताने बस स्थानक हे ठिकाण, लाल गाड्या यांचं प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या जीवनात किती महत्वाचे स्थान असते आणि त्या भोवती कितीतरी आठवणी कशाप्रकारे साठलेल्या असतात यांची प्रकर्षाने जाणीव झाली.


*बस स्टँड म्हणजे सर्व प्रकारच्या श्रमिक लोकांच्या विविध भाव-भावनांनी गजबजलेले ठिकाण*


बस स्टँड म्हणजे अनेक प्रकारच्या लोकांची गर्दी, त्यात माहेरी राहून सासरी परतत असलेल्या पोरी व बायका, त्यांची लहानगी चिल्लर पार्टी, त्यांना सोडायला आलेली घरातली मंडळी किंवा सासरहून माहेरी निघालेल्या पोरी व बायका आणि त्यांच्यासोबतचा लवाजमा, रोज शाळा अगर कॉलेजला गावाहून ये-जा करणारे विद्यार्थी, एकाच 'रुट'वर रोजचा प्रवास करणारे व बाहेरगावी कामास असलेले कर्मचारी, दवाखान्यासाठी, शासकीय अगर कोर्ट-कचेरिच्या कामासाठी तालुक्याच्या अगर जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करणारे लोक, देव-दर्शन, तीर्थाटण यासाठी निघालेले भाविक, शेतीसाठी खत, बि-बियाणे, औजारे, तत्सम वस्तू खरेदी करण्यासाठी गावातून शहराकडे आलेले शेतकरी, गावाहून शहराकडे खरेदीसाठी आलेले गृहस्थ व गृहिणी अशा ना-ना प्रकारचे लोक असतात. यातल्या प्रत्येकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांच्या हालचाली यातून समाजाचे एकंदर चित्र स्पष्ट होते. इथे उभे असणाऱ्या विविध लोकांचे चेहरे वाचले की सर्वसामान्यांच्या जगण्यातील सुख, दु:ख, आनंद, विरह, वेदना, यातना, उत्साह, उर्मी, चिकाटी, आशा-आकांक्षा हे सर्व भाव अनुभवता येतात. एकाच ठिकाणी समाजाच्या सर्व प्रकारातले श्रमिक, कष्टकरी एकाच वेळी पहायला मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे बस स्टँड. बस स्टँड हे नुसतेच लोकांनी नाही तर या लोकांच्या विविध भावनांनी देखील सतत गजबजलेले असते.


*'बस-स्टँड'चे सर्वसाधारण चित्र*


बस स्टँड म्हणजे लाल गाड्यांची सततची ये-जा, या गाड्यांची घारघुर, गाड्यांच्या सायलेंसरमधून बाहेर पडणारा धूरांचा लोट आणि त्याचा शिसारी आणणारा वास, विविध फलाट व त्यावर रंगीबीरंगी अक्षरांत लिहिलेली गावांची व शहरांची नावे, रंग उडालेल्या, पोपडे निघालेल्या भिंती, त्यावर मजनूनी लिहिलेली प्रेयसींची नावे, याच भिंतींवर चिटकावलेले जाहिराती, सामाजिक-राजकीय उपक्रमांचे पॅम्प्लेट्स, जागोजागी प्रत्येक कोपऱ्यात सुपारी, तंबाखू, मावा, मटरेल खााऊन थुंकलेली घाण व त्याचा उबग आणणारा वास, बस स्टँड वरील विविध स्टॉल्स व त्याठिकाणी लावलेल्या उदबत्यांचा बस स्टँड मधील घाण वासावर मात करणारा सुवास, बस स्टँड मधील कॅन्टीनमधून मध्येच दरवळणारा इडली, सांबार अगर चहाच्या वाफांचा वास, बस स्टँड शेजारीच असणारे रसवंती गृह व त्याठिकाणी लावलेल्या घुंगरांचा सतत एका ठराविक लयात घुमत राहणारा आवाज, रसवंती गृहाबाहेर पडलेल्या उसाच्या चिपाडावर, टेबलावर घोंघावणाऱ्या माशा, या माशांना सतत हातवारे करीत हुसकावून लावू पाहणारा मालक, कामकरी पोरं व ग्राहक, माशा जाव्यात म्हणून लावलेल्या धूपबत्तिचा दरवळणारा तर कधी कधी असह्य होणारा वास व धूर, 'ट्रे' मधून किंवा 'स्टँड' मधून उसाच्या रसांचे ग्लास घेऊन ओरडत फिरणारी पोरं, गाडी लागल्याने गाडीतून उतरताच किंवा गाडी थांबताच गाडीच्या खिडकीतून उलट्या करणारे किंवा कोरड्या ओकाऱ्यांचा आवाज करणारे प्रवासी, बस स्टँड च्या शेजारीच असलेले प्रचंड घाण स्वच्छतागृह, त्या स्वच्छता गृहातून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी नाकावर रुमाल, पंचा, साडीचा पदर दाबून थांबलेली बायका व माणसं, बस स्टँडभर लेमन गोळ्या, चनेफुटाणे, शेंगा, खारीमुरी, बिस्किटे, पाण्याचे पाऊच व बाटल्या विकण्यासाठी ओरडत फिरणारे विक्रेते, फलाटावर लागलेल्या किंवा फलाटावरून सुटणाऱ्या गाड्यांची माईकवरून एका विशिष्ट आवाजात दिली जात असलेली माहिती, चौकशी कक्षाबाहेर लगबग करणारा घोळका, फलाटावर गाडी लागताच गाडीत सीट पकडण्यासाठी सुरु असलेली धावपळ, गाडीच्या बाहेरून गाडीच्या खिडकीला टांगून खिडकीतून गाडीतल्या सीटवर रुमाल टाकत जागा पकडू पाहणारे धडपडे, माझी सीट-तुझी सीट म्हणत होणारे वाद, ड्रॉयव्हर-कन्डक्टर लोकांचे कधी वैतागलेले तर कधी ड्युटी संपली म्हणून सुटकेचा निश्वास सोडणारे चेहरे, बस स्टँड वर फिरणारे भिकारी-मागतकरी, बस यायला उशीर झाल्याने कंटाळून बसस्टँडभर हुंदडत, गोंधळ करत खेळणारे व मध्येच खाऊ विक्रेत्याकडे आशाळभूतपणे पाहणारे व तो मिळवण्यासाठी सोबतच्या पालकांची मनधरणी करणारे बालबच्चे असे सर्वसाधारण चित्र असते. तालुका लेव्हलच्या कुठल्याही बस स्थानकावर जा, तुम्हाला असेच चित्र साधारणत: पहायला मिळेल.


*बस स्टँड व लाल गाड्यांशी निगडीत माझ्या आठवणी*


माझा जन्म वडलांच्या नोकरीच्या ठिकाणी सिल्लोड येथे झाला. जन्मल्यानंतर काही महिन्यांनी व नंतर दर सुट्ट्याला आम्ही गावी यायचो ते लाल गाडीनेच. अर्थात या आठवणी मला असणे शक्य नाही पण न कळत्या, चिमुकल्या वयापासूनच लाल गाडीला आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. पुढे वडलांच्या मृत्यूनंतर पेन्शनच्या कामासाठी अनेकवेळा संभाजीनगर, नागपूर येथे जावे लागत असे. तेव्हा मी लहान असल्याने आई व आजोबा मला सोबत घेत असत. यातला बहुतांश प्रवास लाल गाडीनेच झाला. यातल्या पुसटशा आठवणी व चित्र आजही डोळ्यासमोर तरंगतात. आम्ही शिक्षणासाठी उमरग्याला स्थाईक झालो. उमरगयाहून प्रत्येक सणावाराला आम्ही आजोळी, माडज येथे, लाल गाडीने जात असू. माडजचे आजोबा कॉ. रामराव गायकवाड यांच्यासोबत अनेकदा सुरुवातिच्या काळातला प्रवास झाला. त्यांनी बसच्या पाट्या कशा वाचाव्यात, आपली बस लागणारे फलाट कसे ओळखावे, तिकीट कसे काढावे, काढलेले तिकीट प्रवास होईपर्यंत कसे व का सांभाळून ठेवावे, तिकिटासाठीच्या पैशांचा हिशेब कसा ठेवावा असे सगळे शिकवले. लाल गाडी, प्रवासादरम्यान खिडक्यांतून धावत्या झाडांचा पाहिलेला पट, खिडकीची सीट मिळवण्यासाठी केलेली भांडणं, बस मध्ये लेमन गोळ्या चघळताना चुकून गोळी गिळली गेली तर आता पोटातून गोळ्यांचे झाड येईल अशी भीती घातली गेल्याने पुढे कित्येक दिवस घेतलेली धास्ती अशा लहानपणच्या अंनत आठवणी बस स्टँड व लाल गाड्यांभोवती साठलेल्या आहेत.

माडजच्या माझ्या आजोबांचा सर्व नातवंडाना प्रवास घडवण्याचा, प्रवासाद्वारे विविध गोष्टी शिकवण्याचा कटाक्ष असे. घरात एखादे लग्न कार्य असेल तर लग्न पत्रिका वाटण्याचे काम ते एका ज्येष्ठासोबत लहान नातवंडाकडे सोपवत. जेणेकरून बसने प्रवासाची माहिती व्हावी व नात्यागोत्यातल्या लोकांची गावे, घरे इत्यादी माहित व्हावे. या चिट्ट्या वाटण्यासाठी लहानपणी लाल गाड्यांनी अनेकदा प्रवास केला.

बारावी झाल्यांनतर पुण्याला लॉ साठी ऍडमिशन घेतले. पहिल्यांदा सगळे सामानसुमान घेऊन पुण्याला जाताना घरचे, नातेवाईक सोडून अनेक ज्येष्ठ लोक, माझ्यापेक्षा वयाने मोठीं असलेली विद्यार्थी चळवळीतील तरुण मित्रमंडळी, माझ्यासोबतचे शाळा-कॉलेजातील मित्र, गल्लीतले मित्र असा फार मोठा लवाजमा मला सोडवायला बस-स्टँड वर आला होता. तो क्षण अतिशय भावनिक व अविस्मारणीय ठरला. पुढे प्रत्येक सुट्ट्याला मी बहुतांश वेळा लाल बसने प्रवास करायचो. दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यात विद्यार्थ्यांना असलेल्या लाल बसच्या खास सवलतीचा लाभ घ्यायचो. या काळात गावाकडची ओढ, गाडीत भेटलेली गावाकडची माणसं आणि त्यांच्यासोबतच्या गप्पा अशा अनेक आठवणी आहेत, ज्या बस-स्टँड व लाल गाड्यांनी गुंफल्या गेल्या आहेत. 

वकीलीचे शिक्षण पूर्ण केल्यांनतर सन 2011 ला मी लॉ फर्म जॉईन केली. लॉ फर्म मधील बाहेरची कामे माझ्याकडे आली. 2011 ते 2017, असा सहा वर्षांचा काळ, फर्म ने मला स्वतंत्र कार देईपर्यंत मी लाल बसने प्रवास केला. यात पुण्याहून बारामती, नाशिक, धाराशिव, धुळे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, जळगाव असा प्रवास अनेक वर्ष घडला. माझ्या करीअरला आकार देण्यातही बस स्टँड व लाल गाड्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. 


*बस स्टँड म्हणजे प्रेमी युगुलांचा नजरेतून गप्पा मारण्याचा अड्डा*


आता मोबाईल येण्याने जमाना खूप पुढे गेला आहे. तरुण मुला-मुलींच्या नात्यालाही प्रचंड स्वातंत्र्य मिळाले आहे. पण एकेकाळी संवादाची साधने दुर्मिळ होती. तरुण मुलगा व मुलगी एकमेकांशी लगट करण्याला प्रचंड मर्यादा होत्या. त्या काळात एकमेकांकडे तासंतास बघत राहणे हेच एक संवादाचे प्रभावी माध्यम होते. प्रेमी युगूलांसाठी असे एकमेकांकडे बघत रहायला एकमेव सोईचे ठिकाण म्हणजे बस-स्टँड. शाळा-कॉलेजला दररोज ये-जा करणाऱ्या तरुणाईत बस स्टँड वर आपापल्या आवडत्या व्यक्तीला पाहत, नजरेने खुणावत बसण्याला एकेकाळी फार 'क्रेज़' होता. या अर्थाने बस स्टँड हे अनंत प्रेम कहाण्यांचा, आठवणींचा अड्डा आहे. 


*लाल परी : विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पोहोंचवणारी वाहिनी*


लाल गाड्यांनी ग्रामीण भागातून शहरात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पोहोंचवण्याचे महत्वाचे योगदान पार पाडले आहे. पूर्वी गावाकडची शहरात शिकायला आलेली पोरं-पोरी परवडत नाही म्हणून किंवा चांगले जेवण मिळत नाही म्हणून सहसा मेस लावणे टाळत असत. अशा विद्यार्थ्यांसाठी गावाकडून दररोज जेवणाचे डबे आणण्याचे आणि रिकामे डबे परत नेण्याचे नित्याचे काम लाल गाडी व त्यातल्या कंडक्टरकडे असे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा लाल गाड्यांनी हे काम चोखपणे पार पाडले आहे. घर सोडून बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईच्या ममतेचे चार घास पोहोंचवण्याचे महत्वाचे काम लाल गाड्यांनी पार पाडले आहे.


अशाप्रकारे बस स्टँड व लाल गाड्या यांना सर्वसामान्य माणसाच्या जगण्यात अनन्यसाधारण महत्व आहे. जगण्यातल्या प्रत्येक प्रसंगातल्या आठवणी बस स्टँड व लाल गाड्यांनी गुंफलेल्या आहेत. आपल्याही न कळत बस स्टँडने व लाल गाड्यांनी आपल्या जगण्यात अतिशय मोलाचें काम केलेले असते. जाणीवांच्या व आठवणींच्या पटलावर बस स्टँड व लाल गाडी अनेक प्रसंगांत ठळकपणे दिसून येतात. बस स्टँड व लाल गाड्या म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या अंनत आठवणींचा केंद्रबिंदू आहे असे म्हंटले तर अजिबात वावगे होणार नाही.


© ऍड. शीतल शामराव चव्हाण

(मो. 9921657346)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा