कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
-----गणपती बरोबरच गौरीच्या आगमनासाठी सर्वचजण आतूर झाले असून ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडप उभारणी अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर गौरी सजावट व त्यासमोर ठेवायच्या साहित्याची दुकाने बाजारपेठेत थाटलेली आहेत.
दरवर्षी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी शाडू मातीच्या मूर्त्यांच्या किमती स्थिर असल्याची माहिती जालींदर कुंभार यांनी दिली. तर गणेशोत्सवासाठी सजावटीच्या साहित्याच्याही किमती स्थिर असून बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी उसळली असल्याचे उमाजी भंडलकर यांनी सांगितले.
यावर्षी बाजारात फॅन्सी झाडांचे विविध प्रकार आले आहेत. गौरींसाठी दागिने, हत्ती, वाघ, हरण, गाय, मासा तसेच कापडी फुलेही पाहायला मिळत आहेत. पाच व सात फुटांच्या लडी, आकर्षक मुकुट, हिरव्या पानांच्या माळा, गळ्यातील विविध प्रकारचे हार, कंबरपट्टा, बाजूबंद, अँक्रेलिक, फर, सॅटीन, टिकली असे कापड, चौंरग पाट विविध आसने अशा प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध असल्याची माहिती मुमताज फुलारी यांनी दिली.
सजावटीसाठी विविध प्रकारच्या दिव्यांच्या माळांनीही बाजारपेठ उजळून गेली आहे. विक्रीसाठी अनेक दुकानदारांनी या माळा लावलेल्या असून माळांच्याही किमती यंदा स्थिर असल्याचे सांगितले गेले. माळांसोबतच विविध प्रकारच्या दिव्यांची रोषणाईच्या खरेदीसाठीही बाजारात गर्दी होत आहे.
गणरायासोबतच गौरी आगमनाच्या दृष्टीनेही घरोघरी महिलांची लगबग सुरु झाली आहे. गौरी सजावटीचे सुंदर देखावे उभारले जातात. यातून काही सामाजिक संदेशही देण्याचा दरवर्षी प्रयत्न केला जातो. बाजारात अनेक ठिकाणी गणेशमूर्ती व सजावटीच्या साहित्याचे स्टॉल सजले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाचीही तयारी अंतिम टप्प्यात आहे.
फोटो - अकलूज येथील बाजारपेठेत गौरी व गणपती सजावट दुकाने थाटली आहेत.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा