Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

उजनी धरणात परदेशी मासे हटवून स्थानिक मासे संवर्धन करण्यासाठी बी एन एच एस व सिप्ला फाउंडेशन च्या पुढाकाराने व जलसंपदा विभागाच्या सहकार्याने तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने सुरू


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी

डॉ.संदेश शहा

मो:-9921 419 159

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील भीमा नदी परिसरातील गोड्या पाण्यातील मासे विक्री साठी संपूर्ण भारतात बाजारपेठ मिळाली आहे. मात्र राज्यात सर्वाधिक मृतसाठा असलेल्या उजनी जलाशयात चिलापिया, आफ्रिकन कॅटफिश, सकरमाउथ कॅटफिश, इपोमिया आणि वॉटर हायसिंथ या सारख्या आक्रमक परदेशी मत्स्य प्रजातींमुळे मूळस्थानिक मत्स्य प्रजातीला धोका निर्माण झाला असून येथील जैव वैविध्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणीय असमतोल निर्माण झाला आहे. त्याची दखल उच्च पातळीवर घेतली गेली असून यावर उपाय म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या पुढाकाराने तसेच जलसंपदा विभागाच्या सहकार्याने पर्यावरण पुनर्स्थापना आणि शाश्वत मत्स्यविकास कार्यक्रम सुरू झाला आहे. याअंतर्गत सप्टेंबर २०२५ पासून परदेशी माशांचे उच्चाटन, मूळ स्थानिक मासे उत्पादन लागवडीला प्रोत्साहन आणि मच्छिमारांना प्रशिक्षण देण्यावर नियोजनबध्द भर देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत असून त्यासाठी स्थानिक मच्छीमारांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

भीमा नदीवरील उजनी धरणातील यशवंतसागर जलाशय हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे मानवनिर्मित पाणथळ क्षेत्र आहे. हा अथांग जलाशय शेतीसाठी पाणी, जल विद्युत निर्मिती आणि पिण्यासाठी पाणी पुरवते. मध्य आशियाई पक्षी मार्गावरील स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा जलाशय महत्त्वाचा थांबा असून रोहित पक्ष्यासह इतर २५० हून जास्त पक्षांचे हे सारंगगार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे बीएनएचएसने याला महत्त्वाचे पक्षी क्षेत्र (आयबीए) म्हणून घोषित केले आहे. स्थानिक मच्छिमार आणि पक्षी पर्यटनातून या परिसरातील समुदायांना उत्पन्न मिळते. बीएनएचएस आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून, जलसंपदा विभागाच्या सहकार्याने, हवामान बदलाचा विचार करून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षे हा प्रकल्प उजनी जलाशयातील जटिल पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करून स्थानिक समुदायांसाठी शाश्वत भविष्य घडवेल. हवामान बदलाचा देखील या प्रकल्पा अंतर्गत अभ्यास होत असल्याने हा उपक्रम पर्यावरण आणि उपजीविका यांचा समतोल राखण्यासाठी देशभरात एक आदर्श ठरेल, असा विश्वास बीएनएचएस च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 



* आक्रमक प्रजाती मुळे पर्यावरणाला धोका :

उजनी जलाशयातील पर्यावरण आक्रमक परदेशी प्रजातींमुळे धोक्यात आहे. यात इपोमिया, वॉटर हायसिंथ आणि टायफा या वनस्पती आणि चिलापिया, आफ्रिकन कॅटफिश, ॲमेझॉनियन सकरमाउथ कॅटफिश आणि एशियाटिक प्लॅटमाउथ कॅटफिश यासारख्या माशांचा समावेश आहे. या प्रजाती स्थानिक वन्यजीवांशी स्पर्धा करतात, अन्नसाखळी विस्कळीत करतात आणि मच्छिमारांचे आर्थिक नुकसान करतात. विशेषतः सकरमाउथ कॅटफिशला बाजारात मागणी नसल्याने मच्छिमारांचे खूप नुकसान होते. या माशांमुळे नदीकाठाची धूप वाढते, कारण ते प्रजननासाठी एक ते दोन मीटर खोल बीळ खणतात, ज्यामुळे नदीचे पात्र अस्थिर होऊन पूराचा धोका वाढतो. मांगूर, पंकज सारख्या अवैध परदेशी माश्यांचे इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात भीमा नदी काठी ३५ हून गावात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मत्स्य विभागाने देखील परदेशी माश्यांचे उत्पादन करणारी तळी उध्वस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी अवैध मासे माफियांवर कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.

* परदेशी माशांचे उच्चाटन आणि कार्यशाळा :

बीएनएचएस सप्टेंबर २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यापासून परदेशी माशांचे उच्चाटन सुरू करणार आहे. स्थानिक मच्छिमारांचे गट तयार करून, वेगवेगळ्या जाळ्यांचा वापर करून प्रौढ मासे आणि पिल्लं पकडली जातील. यावेळी स्थानिक मासे जाळ्यात आल्यास त्यांना पुन्हा पाण्यात सोडले जाईल. मच्छिमारांना परदेशी आणि स्थानिक माशां मधील फरक समजण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाईल तसेच एप्रिल - मे २०२६ मध्ये वॉटर हायसिंथ, इपोमिया आणि टायफा या परदेशी वनस्पतींचे उच्चाटन केले जाईल.

* पर्यावरणीय पर्यटनाला चालना...

या प्रकल्पात नवोदित पक्षी मार्गदर्शक आणि मासेमारी करणाऱ्या स्थानिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना संरक्षण कार्यात सहभागी केले जाईल. यामुळे उजनी परिसरात पर्यावरणीय पर्यटनाला देखील चालना मिळेल. त्यामुळे स्थानिकांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होईल. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासह स्थानिक व्यवसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल. हा प्रकल्प स्थानिक माशांच्या लागवडीला प्रोत्साहन देतो. प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात स्थानिक मत्स्य प्रजाती जलाशयात सोडल्या जातील, ज्यामुळे जैवविविधता देखील संवर्धित होईल. मच्छिमारांना शाश्वत मच्छिमारी तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्यांचे उत्पन्न टिकून राहील आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. “परदेशी प्रजातींचे उच्चाटन आणि स्थानिक प्रजातींचे पुनर्वसन यामुळे उजनीचे पर्यावरण संतुलित होईल असा विश्वास बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उन्मेष कटवटे यांनी व्यक्त केला. उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मत्स्य व्यावसायिक दत्ता व्यवहारे म्हणाले, उजनी जलाशयात राहू, कटला, मिरगल, सफरनेस, गुगळी, वाम, मरळ, चालत, शिंगटा, आंबळी, भाती, कानस, आयर, घोगरा हे गावरान मासे असून त्यांना जास्त मागणी आहे मात्र चिलापिया, पंकज, रूपचंद, मांगुर, बोधवा या परदेशी आक्रमक माशांमुळे गावरान माश्यांचे संख्या कमी झाली असून काही गावरान मासे केवळ नावापुरते सापडत आहेत. मात्र या प्रकल्पामुळे गावरान मासे प्रजाती संवर्धित होणार आहे. त्यामुळे या व्यवसायाला निश्चित चांगले दिवस येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयात कोट्यवधी मत्स्यबीज सोडल्यामुळे सध्या मत्स्य व्यावसायिक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा