इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
भारत हा कृषीप्रधान देश असून देशाची अर्थ व्यवस्था शेती व शेती पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र शेती व्यवसाय हा अस्मानी व सुलतानी संकटावर अवलंबून असल्याने बरेच शेतकरी आर्थिक सालचंदीचे योग्य नियोजन होत नसल्याने या व्यवसायाकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात शेतीच्या क्षेत्रात एक नाविन्यपूर्ण अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे. पुण्याच्या शैलेश मोडक यांनी कमी जागेत, कमी खर्चात कंटेनरमध्ये आरोग्यदायी कोर्डिसेप्स मशरूमची शेती यशस्वी करून शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे. या मशरूमची किंमत तब्बल एक लाख रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहे. विशेष म्हणजे हा मशरूम ऊर्जा वाढवण्या साठी आणि निरामय आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील या अभिनव यशस्वी शेती प्रयोगाची सध्या युवा शेतकऱ्यां मध्ये विशेष चर्चा आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या शाश्वत फायद्याच्या शेतीची दखल घेऊन या शेतीसाठी सर्व सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या यशस्वी, अभिनव प्रयोगाची माहिती जास्तीतजास्त शेतकऱ्यांसमोर पोहोचविण्यासाठी शासकीय वेबसाईट तयार करणे ही काळाची गरज आहे.
पुणे आता केशर शेती बरोबरच कोर्डिसेप्स मशरूमच्या शेतीतही आघाडीवर आहे. 365 डी फार्म्स फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या शैलेश मोडक यांनी पुण्यात कंटेनरमध्ये ही फायद्याची यशस्वी शेती सुरू केली. यापूर्वी त्यांनी कंटेनरमध्ये इतर मशरूमची देखील शेती केली होती, पण कोर्डिसेप्स मशरूमची शेती हा त्यांचा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. या यशस्वी शेतीमुळे राज्या तील शेतकऱ्यांना आणि नवउद्योजकांना एक नवी दिशा मिळाली आहे. या शेतीसाठी कमी जागा व कमी खर्च लागत असून यासाठी शाश्वत बाजारपेठ उपलब्ध असल्याने हा व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न मिळवता येते. या शेतीमुळे पुणे शेतीच्या नकाशावर ठळकपणे झळकले असून आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना देखील समर्थ फायदेशीर पर्याय उपलब्ध झाला आहे. या फायद्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
कोर्डिसेप्स मशरूम म्हणजे कोर्डिसेप्स मिलिटॅरिस असून हे एक महत्त्वपूर्ण आरोग्यदायी औषधी मशरूम आहे, जे नैसर्गिकरित्या हिमालय, चीन, भूतान आणि नेपाळमध्ये आढळते. आता हे मशरूम इनडोअर वातावरणात आणि प्रयोगशाळेतही यशस्वीपणे वाढवले जात आहे. या मशरूम मध्ये कोर्डिसेपिन, ॲडेनोसिन, बीटा ग्लूकन्स,पॉलिसॅकराइड्सारखे औषधी घटक असतात, ज्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते.
या मशरूम सेवनामुळे शरीरात ऊर्जा वाढून कार्यक्षमता वाढते. त्यामुळे मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती देखील वाढते. हे मशरूम खेळाडू आणि जिम करणाऱ्यांसाठी ऊर्जा वाढवणारे टॉनिक म्हणून वापरले जाते.
या मशरूम मुळे
रोगप्रतिकारक शक्ती वाढून वारंवार आजारी पडणे बंद होते. हे मशरूम फुफ्फुस आणि हृदयाच्या विकारांवर उपयुक्त आहे. हे मशरूम कर्करोगाशी लढण्यास देखील मदत करते. या मशरूम सेवनामुळे मानसिक स्वास्थ्य: सुधारून एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
या मशरूम मुळे चयापयाची क्रिया सुधरून मधुमेह नियंत्रण देखील होत असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास देखील मदत होते.
या मशरूम शेतीसाठी १८ ते २२ अंश सेल्सिअस तापमान आणि ६० ते ७० टक्के आद्रता आवश्यक आहे. ही शेती कंटेनर बरोबरच घरातील छोट्या खोलीत किंवा कोणत्याही इनडोअर जागेतही करता येते. याचा वाढीचा कालावधी सुमारे ६० ते ७० दिवसांचा असल्याने तीन महिन्यात मशरूम विक्री करून पैसे मिळतात. त्यामुळे युवा शेतकरी या आधुनिक शेतीची माहिती करून घेत आहेत. कोर्डिसेप्स मशरूमचा उपयोग पावडर, कॅप्सूल, टॉनिक किंवा अर्काच्या स्वरूपात केला जातो. याशिवाय साबण, फेस वॉश, त्वचेसाठीच्या विविध उत्पादनांमध्येही याचा वापर होतो. चीन आणि जपानमध्ये याला “चायनीज हर्ब” म्हणून ओळखले जाते, तर भारतात याची मागणी उत्तरोत्तर वाढत आहे.
या मशरूमची किंमत किमान ७०,००० ते कमाल १,००,००० रुपये प्रति किलो ( सुक्या मशरूमसाठी) आहे. औषधी कंपन्या, सप्लिमेंट ब्रँड्स, ऑनलाइन मार्केटप्लेस (अमेझॉन, फ्लिपकार्ट, १ एमजी) आणि स्थानिक आयुर्वेदिक दुकानांमध्ये याची विक्री होते. याशिवाय जपान, अमेरिका, कोरिया या देशांमध्ये निर्यातीची मोठी संधी आहे. यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील उपलब्ध असून प्रशिक्षण मूल्य १०,००० ते २५,००० रुपये आहे. या आधुनिक शेतीच्या अधिक माहितीसाठी शैलेश मोडक यांच्या 9767589924 या क्रमांकावर संपर्क साधणे गरजेचे आहे.
फोटो ओळ : कोर्डिसेप्स मशरूम दाखवताना शैलेश मोडक.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा