Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

उजनी धरणातून भिमा नदीत एक लाखाचा विसर्ग, भिमा नदीवरील तीन्ही बंधारे पाण्याखाली तर गणेशवाडी पुलावर पाच फुट पाणी वाहत असल्याने यावरील वाहतूक बंद


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

----- पुणे परिसरातील धरणातून तसेच उजनी धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी उजनीत येत आहे. त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदीत एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. भिमा नदीवरील तीन बंधारे बुडाले तर गणेशवाडी पुलावर पाच फुट पाणी वाहत असल्याने दोन महिन्यांत चौथ्यांदा यावरील वाहतूक सकाळपासून बंद करण्यात आली आहे. तर वीरमधून नीरा नदीत १७ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख १८ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे.

     पुणे परिसर व घाट माथ्यावर तुफान पर्जन्यवृष्टी झाली असल्याने वरील धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदीत सकाळी ९ वाजता एक लाख क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे. 



     उजनी धरणातून भीमा नदीत चौथ्यांदा पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये काल २५ हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला त्यामध्ये आज सकाळी आठ वाजता ६० हजार क्युसेक्स तर साडेनऊ वाजता एक लाख क्युसेक्स करण्यात आला आहे. तर वरील धरणातून उजनी येणारे पाण्यात वाढ झाल्याने तसेच उजनी परीसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भिमा नदीत एक लाख क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. परंतू वरून येणाऱ्या पाण्यात वाढ झाल्यास व पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे उजनी धरण प्रशासनाने शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

     उजनी धरणातून भिमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे भांडगाव, टणू, नरसिंहपूर येथील बंधारे व गणेशवाडी - गारअकोले यांना जोडणारा पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलावरून जवळपास पाच फुट पाणी वाहत असल्याने यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूला नदीवरील पाणी पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. तर कोंढार पट्टृयातील विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली.



     वीर धरणातून नीरा नदीत १७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला आहे. भीमा व नीरा नदीला पूर सदृश्य परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भिमानगर, धरण नियंत्रण विभाग निरा खोरे - विर धरण व उजनी पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

      नरसिंहपूर संगम व नरसिंहपूर शेवरे पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे. कोंडारपट्ट्यातील गावातील विद्यार्थ्यांना गणेशवाडी पुलावर पाणी आले असल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. नदी काठावरील शेतातील पिकात चौथ्यांदा पाणी घुसल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.

चौकट - उजनी धरणातून भीमा नदीत पुरनियंत्रणासाठी पाणी सोडले जात असल्याने गणेशवाडी - गारअकोले पुल दोन महिन्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. परंतू सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तलाटी, पोलिस पाटील असे कोणीही हजर नसल्याने नागरीक पुलावरील पाण्यात धोकादायक पणाने घुसून जिव धोक्यात घालत आहेत. दरम्यान बावडा दुरक्षेत्र पोलिसांनी रस्त्यावर काटेरी बाभळी टाकून पुलावर जाणारा रस्ता अडवला आहे.

फोटो - भिमा नदीवरील गणेशवाडी - गारअकोले पुलावर पाच फूट पाणी वाहत आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा