इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत गौरी विसर्जनाच्या दिवशी भरदिवसा घरफोडी होवून या घटनेमध्ये चोरट्यांनी ९ तोळे दागिन्यांसह १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.
याप्रकरणी अरुण अर्जुन भुजबळ (वय ४१, व्यवसाय शेती, रा. वरकुटे बुद्रुक भुजबळवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी दि.2 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हे त्यांची पत्नी कोमल भुजबळ, आई सिंधू भुजबळ, बहिण विशाखा घनवट व भाचा अविष्कार असे सर्वजण इंदापूर शहरात कामा निमित्त आले होते. त्यावेळी फिर्यादीच्या आईची आई सुभद्रा विठ्ठल मोहिते यांना घरीच ठेवले होते. यावेळी घराच्या समोरील शटर बंद केले होते व आजीला बाहेर येण्याजाण्यासाठी घराच्या पाठीमागील दरवाजाला कडी लावली होती. याचा गैरफायदा घेत तीन अनोळखी चोरट्यांनी दुपारी साडेबारा च्या दरम्यान घरात प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकत एक लोखंडी व एक लाकडी कपाट तोडून त्यामधील अंदाजे दोन तोळे वजनाचे गळ्यातील व कानातील टॉप्स तसेच अंदाजे सहा ते सात तोळे वजनाचे एक गंठन व एक शॉर्ट डायमंडचा गंठण, असे एकूण ९ तोळे वजनाचे दागिने, तसेच १ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम, असा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक बिरादार पुढील तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा